एका लग्नाची दुसरी गोष्ट

hyd

आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद असली तरी गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी विशाखापट्टणम् या शहराला राजधानीचे रूप आले होते. आंध्र प्रदेशामधून तेलंगण हे राज्य वेगळे केले तर हैदराबादचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात असतो. तेलंगणाची राजधानी म्हणून हैदराबाद सुद्धा आंध्रातून बाहेर पडेल तर त्या अवस्थेत विशाखापट्टणम् ही उर्वरित आंध्राची राजधानी होईल, असे बोलले जाते. ते होईल तेव्हा होईल पण गेल्या शुक्रवारी मात्र विशाखापट्टणम्मध्ये राज्याचे बहुतेक मंत्री जमा झालेले होते. एक-दोन मंत्री अपवाद सोडले तर सगळे मंत्री, अनेक आमदार, काँग्रेसचे बहुतेक खासदार विशाखापट्टणम्मध्ये जमा झाले होते. कारण त्या दिवशी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री बोत्सा सत्यनारायण यांच्या कन्येचा विवाह होता. त्यांची कन्या अनुषा ही वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिचा विवाह रिटेल व्यवस्थापनातील बडे प्रस्थ श्री. सोमी यांच्या पुत्राशी झाला.

या विवाह समारंभासाठी विशाखापट्टणम् आणि लगतच्या तीन जिल्ह्यातील सारी शासकीय यंत्रणा घरचेच लग्न समजून राबत होती. या लग्नाचा थाट वर्णन करायची गरज नाही. कारण तो अवर्णनीय होता. या विवाहासाठी ठोकण्यात आलेला मंडपच दोन कोटी रुपयांचा होता. दोन कोटी रुपयांचा म्हणजे त्या मंडपाची किमत दोन कोटी नव्हती तर त्याचे भाडे दोन कोटी रुपये होते आणि हैदराबादच्या एका खास डिझायनरकडून प्रदीपनगर कॉलनी भागात एका विस्तीर्ण मैदानावर हा मंडप ठोकलेला होता. या विवाहासाठी म्हणून खास चार बोअरवेल खोदण्यात आलेल्या होत्या आणि आजूबाजूचा भाग सगळा सरकारी यंत्रणा वापरून स्वच्छ करण्यात आला होता.

यजमान सत्यनारायण हे परिवहन मंत्री असल्यामुळे विशाखापट्टणम् शहरातल्या सगळ्या टॅक्सी गाड्या लग्नाच्या पाहुण्यां-रावळ्यांना नेण्या-आणण्यासाठी कायम बुक करण्यात आल्या होत्या. शहरातल्या सगळ्या हॉटेलातले व्हीआयपी सूटस् मंत्री, आमदार, खासदार यांच्यासाठी बुक करण्यात आले होते. राज्यातल्या प्रत्येक मंत्र्याने याच दिवशी विशाखापट्टणम्मध्ये सरकारी काम काढलेले होते आणि तरी सुद्धा प्रत्येक मंत्री या विवाहाला सहकुटुंब आलेला होता. मात्र त्यांच्या राहण्याचा, जाण्याचा सारा खर्च सरकारने केलेला होता. प्रत्येक मंत्र्यामागे राज्याच्या तिजोरीतून या एका दिवशी ५० हजार रुपये खर्ची पडलेले आहेत. या लोकांनी तिथे सरकारी काम काय केले, हा संशोधनाचा विषय आहे. पण खर्च मात्र सरकारला पडलेला आहे.

मंत्र्याच्या कन्येच्या या विवाहामध्ये ३०० इनोवा आणि स्कार्पिओ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या आणि या सगळ्या व्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी ३५ पोलीस अधीक्षक आणि ५०० कॉन्स्टेबल्स् एवढा फौजफाटा सरकारी खर्चाने नेमलेला होता. सरकारच्या विविध खात्यातील तीन जिल्ह्यातील १२० विशेष अधिकारी विवाह समारंभासाठी डेप्युट करण्यात आले होते आणि पत्रिका पाठवणे, आलेल्यांचे स्वागत करणे, आहेर स्वीकारणे आदि सारी कामे हे सरकारी अधिकारी करत होते.

Leave a Comment