आकाश टॅब्लेटचे यूएनमध्ये सादरीकरण

नवी दिल्ली दि. ६ – जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट म्हणून ओळख निर्माण केलेल्या भारतीय आकाश टॅब्लेटचे २८ नोव्हेंबरला यूकेच्या वर्ल्ड बॉडीज हेडक्वार्टरमध्ये सादरीकरण करण्यात येत असून या कार्यक्रमाला यूएन सेक्रेटरी जनरल बान की मून उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक स्पर्धात्मक किमतीच्या या टॅब्लेटचा शोध लावल्याचे श्रेय भारताला दिले गेले आहे.

भारताचे यूकेतील कायमस्वरूपी प्रतिनिधी हरदीपसिंग पुरी हे या टॅब्लेटचे सादरीकरण करणार असून कॅनडातील ज्या डेटाविंग कंपनीने या टॅब्लेटचे उत्पादन व पुरवठा केला त्या कंपनीचे सीईओ सुनीतसिंग टुली हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारने या टॅब्लेट उत्पादनाचे कंत्राट टुली यांना दिले आहे. टुली या टॅब्लेटचे प्रेझेंटेशन यूएन प्रेक्षकांसमोर करणार आहेत.

गेल्या आक्टोबरमध्ये भारताने आकाश हा जगातील सर्वात कमी किमतीचा टॅब्लेट तयार केला असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्याचा मुख्य उपयोग केला जाणार आहे. हा टॅब्लेट विद्यार्थ्यांना सबसिडाईज्ड दरात म्हणजे अवघ्या १५०० रूपयांत दिला जाणार आहे. शैक्षणिक क्रांतीत या टॅब्लेटमुळे एक पाऊल पुढे टाकले जाईल असा विश्वास भारतातील शिक्षणतज्ञांनी व्यक्त केला आहे.