मलालाचे कुटुंबिय ब्रिटनमध्येच राहणार

इस्लामाबाद दि. ३ – तालिबानी हल्यात जखमी झालेल्या व सध्या ब्रिटनमध्ये उपचार घेत असलेल्या मलाला युसुफजाईच्या कुटुंबियांनी आता ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला असून पाकिस्तान सरकारने तिचे वडील झियाउद्दीन यांना पाक दूतावासात नोकरी दिली असल्याचे समजते.

तालिबान विरोधात वक्तव्य करणार्याद चौदा वर्षीय मलाला युसुफजाईला गोळ्या घातल्या गेल्या होत्या. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिच्यावर ब्रिटनमध्ये उपचार केले जात आहेत. मलाला पाकिस्तानमध्ये परतली तर पुन्हा तिच्यावर हल्ला करण्याची धमकी तेहरीक इ तालिबान संघटनेने यापूर्वीच दिली आहे. मलालाचे आईवडील व दोन भाऊ तिला भेटण्यासाठी २५ आक्टोबरलाच ब्रिटनला गेले असून झियाउद्दीन यांनी ब्रिटनमध्येच आश्रय मागण्याचा निर्णय घेतला होता. तसा आश्रय मागितला तर पाकची नाचक्की होइल या भीतीने पाकचे गृहमंत्री  मलिक यांनी त्यांना ब्रिटनमध्ये पाक दूतावासात नोकरीची ऑफर दिली असल्याचे समजते.

मलिक यांनी त्यासाठी पाकचे अध्यक्ष झरदारी यांची भेट घेऊन झियाउद्दीन यांना पाक दूतावासात नोकरी देण्यासाठी शिष्टाई केली असेही सांगण्यात येत आहे. मलालाची तब्येत आता पुष्कळच सुधारली असली तरी तिला अजून कांही महिने रूग्णालयात राहावे लागणार आहे.