जगभरातील अब्जावधी जनता आज कर्करोगाच्या विळख्यात सापडली असताना ब्रिटनमधील संशोधकांनी केवळ वीस मिनिटांत कॅन्सरचे निदान करू शकणारे, त्यावर योग्य औषधोपचार सुचविणारे जगातील पहिले उपकरण तयार केले असून त्यामुळे मानवजातीचे मोठे कल्याण होऊ शकणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
कॅन्सरचे निदान करून औषधोपचार सुचविणारे उपकरण
ट्यूमर प्रोफायलर असे नामकरण करण्यात आलेल्या या उपकरणामुळे डॉक्टर, नर्स तसेच औषध निर्माण तज्ञही संबंधित व्यक्तीला कोणत्या स्वरूपाचा कर्करोग आहे हे केवळ वीस मिनिटांत सांगू शकणार आहेत. तसेच त्यावर कोणती औषधे योग्य आहेत याचीही माहिती उपकरण देणार आहे. पुढच्या तीन वर्षात या उपकरणाचा वापर यूके मध्ये सुरू करण्यात येणार आहे. क्वांटू एम डीएक्स ही खासगी कंपनी, न्यू कॅसल विद्यापीठ आणि शेफिल्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त संशोधनातून हे उपकरण तयार करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संशोधक जॉन बर्न म्हणाले की सध्या ट्यूमर झाला की त्याचा थोडा भाग काढून कर्करोगाचे निदान करण्यासाठी तो प्रयोगशाळेकडे पाठविला जातो व कर्करोगाचे निदान होण्यास कांही दिवस जातात. नव्या उपकरणामुळे जागच्या जागी वैद्यकीय क्षेत्रातील कोणीही तज्ञ ट्युमरचे निदान केवळ वीस मिनिटात करू शकेल. यात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून डीएनए टिश्यूचे विश्लेषण करून हे उपकरण कर्करोगाचे स्वरूप ओळखेल आणि त्यावर योग्य औषधेही सुचवेल. जगात आज १२ दशलक्ष कर्करूग्ण असून त्यांचे आयुष्य यामुळे वाढू शकणार आहे. हे उपकरण रूटीन पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत, ऑपरेशन थिएटरमध्येही सहज वापरता येणार आहे.
या उपकरणाची किंमत कमी आहे तसेच ते वापरायसाठी तज्ञांची गरज नाही. हे उपकरण स्वतःच ट्यूमर काढेल त्याचे विश्लेषण करेल आणि औषधेही सुचवेल. त्यामुळे सहज परवडणार्याू किमतीत कर्करूग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
