नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी उप महासचिव शशी थरूर यांनी शुक्रवारी मानव संसाधन विकास राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी दर्जेदार शिक्षणावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी देशाचे विदेश राज्यमंत्रीपद भूषविलेल्या थरूर यांना कोची आयपीएल संघाच्या मालकीबाबत वादग्रस्त व्यवहारात कथित सहभाग असल्याबद्दल राजीनामा द्यावा लागला होता. ट्विटरवरून आणि जाहीरपणे केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळेही थरूर अनेकदा अडचणीत आले होते. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.
युवकांची मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात सर्वांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध असण्याची मोठी आवश्यकता असून युवकांना शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनविण्याबरोबरच प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत थरूर यांनी यावेळी व्यक्त केले. देशात वाढणारा नक्षलवाद आणि माओवाद हा युवकांना रोजगार उपलब्ध न झाल्याने आलेल्या नैराश्याचा परिणाम असल्याचेही ते म्हणाले.