विना अनुदानित सिलेंडरची दरवाढ तूर्त टळली

नवी दिल्ली: विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात गुरुवारी पेट्रोलियम मंत्रालयाने घोषित केलेली
साडे सत्तावीस रुपयांची दरवाढ विरोधकांच्या कडव्या विरोधाने तात्पुरती का होईना; टळली आहे. मात्र हिमाचल प्रदेश आणि गुजराथच्या निवडणुका पार पडताच पुन्हा दरवाढीचे पाउल उचलले जाण्याची शक्यता आहे.

गुरुवारी संध्याकाळी सिलेंडरच्या दरात २७.५० रुपयांची वाढ घोषित करण्यात आली. मात्र रात्री उशीरापर्यंत या विषयावर मोठा गदारोळ करीत विरोधकांनी दरवाढीला विरोध केला. त्यानंतर दरवाढ मागे घेण्यात आली. मागील दोन महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ३ वेळा सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. मात्र हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पुन्हा दरवाढ झाली तर त्याची राजकीय किंमत मोजावी लागण्याच्या भीतीने गुरुवारची दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनुदानित सिलेंडर्सची संख्या मर्यादित केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानितसिलेंडर्सचे दर गॅसच्या आंतराराष्ट्रीय दराशी निगडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या दराचा आढावा घेऊन त्या महिन्याची सिलेंडरची किंमत निश्चित करण्यात येत आहे.