सँडी वादळाने ओबामांचा विजय पक्का?

वॉशिग्टन दि. २ -सँडीच्या तडाख्याने अमेरिकेतील १७ राज्यातील ८० लाखांवर नागरिकांना तडाखा दिला असताना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराची धुमाळी तत्क्षणी थांबवून सर्व शक्तिनिशी अहोरात्र वादळगस्तांसाठीच्या मदतकार्यात गुंतलेल्या बराक ओबामा यांचा निवडणुकीतला विजय आता अधिक पक्का झाल्याने नुकत्याच घेतलेल्या जनमत चाचण्यांतून पुढे आले आहे. म्हणजे एकप्रकारे सँडी ओबामांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यास सहाय्यकच ठरले असल्याचे दिसून येत आहे.

वादळाचा तडाखा बसलेल्या न्यूजर्सीला ओबामांनी बुधवारी भेट दिली आणि नागरिकांना धीर दिला. वादळाचा तडाखा बसलेल्या बर्यााच राज्यात रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असतानाही  ओबामांनी तेथील मदतकार्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. न्यूजर्सीचे गव्हर्नर क्रिस्टी ओबामांचे कट्टर विरोधक आहेत मात्र दोघांनीही यावेळी राजकारण बाजूला ठेवून मदतकार्याला प्रथम प्राधान्य दिले. इतकेच नव्हे तर क्रिस्टी यांनी ओबामांनी घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा केली तर ओबामांनीही क्रिस्टी यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी ६ नोव्हेंबरला मतदान होत आहे. गेल्या आठवड्यांत घेतलेल्या जनमत चाचण्यात विरोधी नेते रोमनी यांचे पारडे किचित जड भासत होते मात्र वादळानंतर ओबामांनी २० टकके आघाडी घेतली असल्याचे जनमत चाचण्यांतून दिसून आले असून ओबामा यांची राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात महागडी निवडणूक असून यासाठी तब्बल ६ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आला आहे.