केजरीवालला सत्तेची हाव होऊ शकते – अण्णा हजारे

पुणे दि. २ – अरविंद केजरीवाल त्यागी वृत्तीचा आहे. कुटुंबापेक्षाही तो देश आणि समाजासाठी अधिक जागरूक आहे. त्याला पैशाची लालसा नाही. मात्र राजकारणात गेल्यावर कदाचित त्याला सत्तेची लालसा होऊ शकेल असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. अर्थात निवडणुका लढवून विजय मिळविला तरी तो मंत्रीपद घेणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राजकारणात नुकतेच उतरलेले इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते व अण्णा हजारे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी अरविद केजरीवाल राजकीय नेत्यांची भ्रष्टाचाराची नव नवी प्रकरणे रोज उकरून काढत आहेत. यामागे सत्तेची हाव त्यांनाही सुटली आहे काय असा प्रश्न अण्णांना विचारला गेला तेव्हा उत्तर देताना ते बोलत होते.

अण्णा म्हणाले अरविंदने भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढताना थोडे तारतम्य दाखविले पाहिजे. रोज नवे प्रकरण उघड करण्यापेक्षा उघड केलेल्या प्रकरणांचा पूर्ण निकाल लावून मगच दुसरे प्रकरण हाती घेतले पाहिजे. सारासार विचार करून भक्कम पुरावे हाती लागल्याशिवाय आरोप करणे चुकीचे आहे. अण्णा म्हणाले की मीही हे काम केले आहे आणि सहा मंत्र्यांनी घरी पाठविले आहे. अरविदनेही तसेच एकाचवेळी सगळी प्रकरणे काढण्यापेक्षा एकामागून एक प्रकरणे हाती घ्यायला हवीत असे त्यांचे मत आहे.

Leave a Comment