सँडी पिडीतांना मदतीची लष्करे तैय्यबाची तयारी

अमेरिकेत धुमाकूळ घातलेल्या सँडी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्व पिडीतांना मदत करण्याची तयारी पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेल्या लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीज मोहम्मद सईद याने दाखविली आहे. इस्लामचे पालन करणारे आम्ही सच्चे इस्लामी आहोत व संकटात सापडलेल्या कोणालाही मदत करण्याची शिकवण आमचा धर्म देतो, त्यानुसारच आम्ही ही मदत देऊ इच्छीतो व त्यासाठी पाकिस्तान सरकारने परवानगी द्यावी असे त्याने जाहीर केले आहे. अन्न, औषधे, डॉक्टर अशी मदत देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला हफिज भारताला जसा हवा आहे तसेच अमेरिकेतही त्याला पकडून देणार्याईला १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हफिज म्हणतो मला पकडण्यासाठी जरी इनाम लावले असले तरी अमेरिकेतील नागरिक सध्या नैसर्गिक संकटात सापडले आहेत आणि त्यांना मदत देणे हे माझे कर्तव्य आहे. गतकाळात सिंध प्रांतात पुराच्या तडाख्यात सापडलेल्या हिदूंनाही जमात उद दवा या इस्लामी संघटनेने मदत दिली होती असेही त्याचे म्हणणे आहे.

लष्करे तैय्यबावर पाकिस्तानातही बंदी आहे तसेच हफीजला स्थानबद्ध केले गेले असल्याचे सांगितले जात असले तरी हफिज पाकिस्तानात खुले आम सार्वजनिक सभा घेत आहे. भारताने मुंबई हल्ल्यातील त्याच्या सहभागाचे पुरावे पाकिस्तानला दिल्यानंतर जगभरातून दबाब वाढल्याने सहा महिन्यांपेक्षाही कमी काळ स्थानबद्द केले गेले होते मात्र २००९ मध्येच लाहोर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्याला मुक्त केले गेले आहे. मुंबई हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या फला-इ-इन्सानियत या संस्थेच्या नावाखाली लष्करे तैय्यबाच्या कारवाया सध्या सुरू असल्याचेही समजते.