देशाचा कारभार पंतप्रधांनांच्या नव्हे; अंबानींच्या हाती- केजरीवाल

नवी दिल्ली: या देशाचा गाडा पंतप्रधान नव्हे; तर मुकेश अंबानी चालवितात आणि पंतप्रधानांच्या काळजाचे ठोके सर्वसामान्यांच्या प्रश्नाने नव्हे तर ‘रिलायन्स’च्या काळजीने वाढतात असा घणाघाती आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केला. भांडवलदारांच्या फायद्यासाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष या दोघांनाही सारखीच चिंता आहे; असेही केजरीवाल म्हणाले.

जयपाल रेड्डी यांना पेट्रोलियम मंत्रालयापासून दूर करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय हा रिलायन्सला रान मोकळे करण्यासाठीच असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. सत्ता कोणाचीही असो; काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष अंबानींच्या खिशात आहेत; अशी टीकाही त्यांनी केली. आंध्र प्रदेशाच्या कृष्णा गोदावरी खोर्‍यातून गॅस उत्पादन करण्यासाठी रिलायन्सने प्रथम सन २००० मध्ये फासे टाकले. सन २००४ मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेसनेही ‘आज्ञाधारक’पणे या व्यवहाराचे पालन केले; याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले.

रिलायन्सने ज्या दरात सरकारला गॅस पुरविण्याची हमी दिली होती; त्या दरात त्यांनी पुरवठा केला नाही. जेवढ्या प्रमाणात रिलायन्सकडून इंधन मिळणे अपेक्षित होते; तेवढ्या प्रमाणात उत्पादन करणेही रिलायन्सला जमले नाही; याकडे निर्देश करून रिलायन्सकडून यासंबंधीच्या करारातील प्राथमिक बाबींचेही उल्लंघन झाल्याची टीका केजरीवाल यांनी केली. सन २०१४ पर्यंत गॅसच्या दरात बदल न करायचा करार असूनही रिलायन्सची गॅसच्या प्रत्येक युनिटची किंमत ४ डॉलरवरून १४ डॉलरपर्यंत वाढवावी अशी मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्यास रिलायन्सला ४३ हजार कोटीचा फायदा होणार आहे; असे केजरीवाल यांनी सांगितले. रिलायन्सची ही मागणी नाकारल्याबद्दलची शिक्षा म्हणून रेड्डी यांना मंत्रीपदावरून हटविण्यात आले आणि त्यांच्या जागी वीरप्पा मोईली यांची वर्णी लावण्यात आली; असा केजरीवाल यांचा आरोप आहे. रिलायन्सला दरवाढ देण्यास रेड्डी यांनी नकार दिलेला असतानाही पंतप्रधानांनी महाधिवक्ते जी ई वहानवटी यांचा अभिप्राय मागविला याचा अर्थ काय; असा सवालही त्यांनी केला.

Leave a Comment