सँडी वादळाचे तडाखा कायम

न्यूयॉर्क दि.३० – कॅरेबियन बेटांना झोडपून आणि ५० बळी घेऊन अमेरिकेच्या पूर्व किनार्याकवर सक्रीय झालेल्या सँडी वादळाने अमेरिकेतही ११ बळी घेतले असून ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सँडीचे चक्रीवादळातून आता नुसत्याच वादळात रूपांतर झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

या वादळामुळे अमेरिकेतील सर्वात जुन्या अणुउर्जा प्रकल्पावर आणीबाणी जाहीर करण्यात आहे. मॉयसर क्रीक येथे असलेल्या या प्रकल्पाला तेथील पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढल्याने धोका असल्याची सूचना जारी करण्यात आली आहे. हा प्रकल्प सध्या बंदच ठेवण्यात आला आहे. न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क लाही वादळाचा जोरदार तडाखा बसला असून या शहरांच्या उपनगरात पाणी भरल्याने रस्ते, रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. न्यूयॉर्कमधील सहा मजली इमारत पूर्ण पडली चार लाखांहून अधिक नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. न्यूयॉर्कच्या बर्याकच भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. या वादळाने अमेरिकेतील १२ राज्यांतील पाच कोटी नागरिकांना तडाखा दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडणूक प्रचार दौरा रद्द करून वॉशिग्टन येथेच तळ ठोकला आहे. देशात अनेक राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून अनेक ठिकाणी जोरदार वादळी वारे, मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.