संशोधकांनी बदलला सोन्याचा झळाळता रंग

जगभरात लोकप्रिय धातू अशी ओळख असलेल्या सोन्याच्या सोनेरी रंग बदलण्यात संशोधकांना प्रथमच यश आले असून साऊथंप्टन विद्यापीठातील संशोधकांनी हे साध्य केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही रंगाचा लेप न देता अथवा रासायनिक प्रक्रिया न करता हा रंग बदलला गेला असून त्याचा फायदा अनेक क्षेत्रांना होऊ शकणार आहे असाही या संशोधकांचा दावा आहे. तसेच त्यामुळे दागिन्यांची प्रचंड व्हरायटी ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल. सोन्याचा एकच नेकलेस एकाबाजूने लाल तर दुसर्या  बाजूने हिरवा अथवा कोणत्याही रंगांचा दिसू शकेल. तीच बाब चांदीच्या दागिन्यांबाबतही होईल.

या प्रयोगाचे प्रमुख प्रो. नोकील झुलूदेव यासंबंधी अधिक माहिती देताना म्हणाले की कोणत्याही वस्तूचा मानवी डोळ्यांना दिसणारा रंग हा त्या वस्तूवर पडणारे प्रकाशकिरण किती शोषले जातात आणि किती परावर्तित होतात यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ एखादी वस्तू लाल दिसत असेल तर याचा अर्थ बाकीच्या रंगाचे प्रकाशकिरण ती वस्तू शोषून घेत असते तर लाल रंग मात्र परावर्तित करत असते. सोन्यावर हा प्रयोग करताना त्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून सोन्याचेच कांही ठराविक उंची, रूंदीचे उंचवटे सोन्याच्या वस्तूच्या पृष्ठभागावर एम्बॉस केले. त्यामुळे सोन्याचा प्रकाश शोषण्याचा आणि परावर्तित करण्याचा पॅटर्न बदलला गेला व परिणामी सोन्याचा रंगही मानवी डोळ्यांना वेगळाच दिसला. चांदी आणि अॅल्युमिनियम या धातूंवरही हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

या तंत्रज्ञानाचा फायदा ज्युवेलरी उद्योगांना जसा होणार आहे तसाच तो बँक नोटा आणि महत्वाची कागदपत्रे यांच्यासाठीही होऊ शकणार आहे. हे तंत्रज्ञान वापरले तर बँक नोटा अथवा कागदपत्रे फोर्जिंग करणे अत्यंत अवघड बनेल असाही त्यांचा दावा आहे. या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.