मला रक्ताचे वावडे नाही: कायदामंत्र्यांनी धमकाविले

नवी दिल्ली: आपल्यावर आरोप करणारे अरविंद केजरीवाल जर फर्रुखाबाद येथे आले तर ते परत जाऊ शकणार नाहीत; अशी धमकी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना तोल ढासळल्याने; मी लेखणीने काम करतो म्हणून मला कायदा मंत्री केले आहे. मात्र याचा अर्थ मला रक्ताचे वावडे आहे असा होत नाही; अशी मल्लीनाथीही खुर्शीद यांनी केली.

खुर्शीद आणि त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांच्या डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टला केंद्राकडून अपंगांना सायकल रिक्षा आणि इतर उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यासाठी मिळालेल्या ७१ लाख रुपयांच्या निधीचा कथित अपहार झाल्याचे प्रकरण इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी लाऊन धरले आहे. या प्रकरणी खुर्शीद यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दिल्ली येथे खुर्शीद यांच्या विरोधात सुरू केलेले आदोलन स्थगित करून केजरीवाल यांनी फर्रुखाबाद या खुर्शीद यांच्या कर्मभूमीत जाऊन त्यांना आव्हान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी केजरीवाल दि. १ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांसह फर्रुखाबाद येथे जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या खुद्द कायदा मंत्र्यांनी केजरीवाल यांना भर पत्रकार परिषदेत धमकावले आहे.