पवार आणि गडकरींचे साटेलोटे: केजरीवाल

नवी दिल्ली: आपापले हितसंबंध सांभाळण्याबाबत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष यांची हातमिळवणी असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पवार आणि गडकरी या दोघांनीही शेतकऱ्यांच्या नावावर माया जमविल्याचा आरोप करून केजरीवाल यांनी विदर्भातील शेकऱ्यांच्या आत्महत्यांना गडकरी यांना जबाबदार धरले आहे.

इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविलेल्या कागदपत्रांवरून गडकरी यांचे व्यावसायिक हितसंबंध शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गडकरींना साथ आहे; असे नमूद करून केजरीवाल म्हणाले की; राज्य सरकारने सन १९९७ मध्ये नागपूर जवळच्या खुर्सापूर येथे बंधार्‍यासाठी अधिग्रहण केलेली सुमारे १०० एकर जमीन गडकरींच्या घशात घातली आहे. गडकरी यांनी ही जमीन मिळविण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना पत्र लिहीले. त्यानुसार गडकरींना ३७ हेक्टर आणि जेम्स ऑफ इंडिया कंपनीला ११ हेक्टर जमीन देण्यात आली.

हा व्यवहार बेकायदेशीर असून यावरून गडकरींचे हितसंबंध कोठे गुंतले आहेत हे दिसून येते. तरीही भाजपने घटनेत दुरुस्ती करून राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पुन्हा गडकरींच्या गळ्यात घालणे अयोग्य असल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले.

दरम्यान; ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपचे राज्यसभा सदस्य बॅ. राम जेठमलानी यांनी गडकरी यांच्या विरोधात बंडाचे निषाण फडकविले आहे. केजरीवाल यांनी गडकरी यांच्या विरोधात पुरावे दिल्यास आपण केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरू; असे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वीही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून त्यांनी गडकरींना विरोध; तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पसंती दर्शविली होती. गडकरींच्या कार्यपद्धतीबद्दलही बॅ. जेठमलानी नाराज आहेत. भाजपने मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे; अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गडकरी यांनी मात्र केजरीवाल यांच्या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. आपली संस्था व्यावसायिक नसून धर्मादाय आहे. या संस्थेमार्फत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती केली जाते. या संस्थेद्वारे १० हजार जणांना रोजगार मिळाला आहे; असा खुलासा करून गडकरी यांनी केजरीवाल यांनी स्वतः येऊन संस्थेचे काम पहावे; असे आवाहन केले आहे. आपण शेतकर्‍यांच्या हिताचेच कार्य करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. केजरीवाल हे नवीन पक्ष स्थापन करीत आहेत. लोकांना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी केजरीवाल बेताल आणि तथ्यहीन आरोप करीत असून घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला फायदा मिळवून देण्याचाही त्यांचा उद्देश असू शकतो; अशी टीकाही गडकरी यांनी केली.

Leave a Comment