सचिन ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानकरी

मुंबई दि.१६ – केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक सन्मानांचा मानकरी असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या तुर्‍यात आणखी एक मानाचे पान खोचले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी सचिनला ऑडर ऑफ ऑस्ट्रेलिया या सन्मानाने भूषविले जाणार असल्याची घोषणा केली असून ऑस्ट्रेलियन  नसलेल्या फारच थोड्या लोकांना हे सदस्यत्व दिले जाते असे समजते.

सचिन सध्या दक्षिण आफ्रिकेत चँपियन लिग टी-२० सामने खेळत आहे. ३९ वर्षीय सचिन हे सदस्यत्व मिळविणारा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी हा सन्मान भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांना २००६ साली देण्यात आला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कायदेविषयक सामंजस्य राखल्याबद्दल हे सदसत्व सोराबजी यांना बहाल करण्यात आले होते.