मारूतीची नवी अल्टो घटस्थापनेला बाजारात

नवी दिल्ली दि.१५ – देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारूती सुझुकीची नवी अल्टो उद्या म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर बाजारात येत असून या काळात या गाडीसाठी १० हजारांच्यावर बुकींग होतील असा विश्वास कंपनीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ( विपणन आणि विक्री) मयंक पारिक याविषयी माहिती देताना म्हणाले की ग्राहकांना गाडीची नक्की किंमत अजून माहिती नाही, ग्राहकांनी गाडी अजून पाहिलेलीही नाही तरीही आत्तापर्यंत ६५०० बुकींग झाली असून उद्यापर्यंत हा आकडा दहा हजारांची संख्या ओलांडेल असा विश्वास वाटतो आहे. 

या नव्या व्हर्जनची किमत दोन लाखांपर्यंत असेल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत असून या गाडीला नॅनो आणि ह्युंडाईची इआर्न या गाड्यांशी कडवी स्पर्धा करावी लागणार आहे. नवी अल्टो इंधन बचत करणारी असून १ लिटरला ती २२ ते २३ किमीचे अॅव्हरेज देईल असे सांगण्यात येत आहे. 

२००१ ला पहिली अल्टो बाजारात आली होती आणि त्यानंतर कंपनीने आजपर्यंत भारतात २० लाख गाड्या विकल्या आहेत तर अडीच लाख गाड्या निर्यात केल्या आहेत. नवी अल्टो सीएनजी मॉडेलमध्येही उपलब्ध असून कंपनीने ही गाडी विकसित करण्यासाठी ४७० कोटी रूपये खर्च केले आहेत. ही गाडी कंपनीचा घसरलेला मार्केट शेअर पूर्वपदावर आणण्यास उपयुक्त ठरेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.