खुर्शीद यांच्या संस्थेची चौकशी सुरू.

लखनौ: केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

खुर्शीद आणि त्यांच्या पत्नी लुईस यांनी त्यांच्या डॉ. झाकीर हुसेन मेमोरिअल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अपंगांना सायकल रिक्षा आणि इतर सामुग्री वितरीत करण्यासाठी निधी प्राप्त केला. मात्र प्रत्यक्षात या निधीचे वितरण न करता सुमारे ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप काही प्रसारमाध्यमे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनने केला आहे.

या आरोपांची दाखल घेऊन उत्तर प्रदेश सरकारने राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आर्थिक गुन्हे विभागाने चौकशी सुरू केली असून लखनौ जिल्हा अपंग कल्याण अधिकार्‍यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आवश्यकता वाटल्यास खुर्शीद दांपत्याकडेही चौकशी केली जाईल; असे आर्थिक गुन्हे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

खुर्शीद यांनी निधी प्राप्त करण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचाही आरोप आहे.