काँग्रेसला फटका

कोणत्याही राज्यातल्या अधूनमधून होणार्‍या पोटनिवडणुका या नेहमीच चर्चेचा विषय होत असतात. कारण एखादी मोठी सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असतानाच अशी पोटनिवडणूक झाली असेल तर त्या सार्वत्रिक निवडणुकीत काय घडू शकेल याचा अंदाज पोटनिवडणुकीच्या निकालावरून येत असतो, असे मानले जाते. हे सर्वथा खरे नाही. शेवटी पोटनिवडणूक ही एका विशिष्ट वातावरणात होत असते आणि होणारी सार्वत्रिक निवडणूक वेगळे विषय घेऊन येणार असते. त्यामुळे एखाद्या पक्षाचा उमेदवार त्या पोटनिवडणुकीत विजयी झाला म्हणजे त्याचाच पक्ष सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेवर येणार, असे काही मानता येत नाही. असे कधी घडलेलेही नाही.

तरी सुद्धा एखाद्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला की, त्यात विजयी होणार्‍या पक्षाचे कार्यकर्ते आता सार्वत्रिक निवडणुकांत असाच निकाल लागणार अशी खात्री द्यायला लागतात. मात्र पराभूत झालेल्या पक्षाचे नेते या एका पराभवावरून पूर्ण सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाचे अंदाज बांधणे कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. 

काल पार पडलेल्या दोन पोटनिवडणुकांनी अशाच चर्चेला प्रारंभ झाला आहे. या दोन्ही पोटनिवडणुका लोकसभेच्या होत्या. त्यातली एक उत्तरांचल तर दुसरी पश्चिम बंगालमधली होती. यातली उत्तरांचलची पोटनिवडणूक काँग्रेसने गमावली आहे. आधी खासदार असलेले उत्तरांचलचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर खासदारकी सोडल्यामुळे त्यांच्या टिहरी या मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. दुसरी पोटनिवडणूक पश्चिम बंगालमध्ये झाली.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी जांगीपूर या लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांच्या या राजीनाम्यामुळे याही लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत मुखर्जी हे निवडून आले. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना या विजयाचा आनंद उपभोगता आला नाही. कारण या मतदारसंघात जवळपास ७ लाख मतदान झाले आणि त्यात अभिजीत मुखर्जी केवळ २ हजार ५०० मतांच्या फरकाने विजयी झाले. एक निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या जागेवर तर दुसरी निवडणूक राष्ट्रपतींच्या जागेवर झाली आणि म्हणून या दोन्ही जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या होत्या. 

अशा निवडणुकांमध्ये साधारणतः सत्ताधारी पक्षाचा विजय होत असतो. परंतु टिहरी मतदार संघात  काँग्रेसचे उमेदवार असलेले साकेत बहुगुणा यांना विजयी करण्यात  मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांना यश आले नाही. उत्तरांचलमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव करून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आलेले आहे. असे असूनही या सरकारला पोटनिवडणुकीतला आपला उमेदवार – आणि तोही मुख्यमंत्र्यांचा मुलगा – निवडून आणता आला नाही. जांगीपूरमध्ये सुद्धा देशाचे राष्ट्रपती झालेल्या प्रणव मुखर्जी यांच्या चिरंजीवाला निसटता विजय मिळाला. केंद्र सरकारमध्ये सध्या एकामागे एक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. केंद्रातले जवळपास नऊ मंत्री भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपात गुंतलेले आहेत. सरकार एका बाजूला भ्रष्टाचाराचे निर्मूलन आपणच करू शकतो असा आव आणत आहे. पण दुसर्‍या बाजूला सार्‍या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली असून हा पक्ष जनतेच्या मनातून उतरायला लागला आहे. त्यातच सरकारने महागाईचे चक्र फिरते ठेवलेले आहे. त्यामुळे सामान्य माणूस जगणे असह्य होऊन त्रस्त झाला आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत खासच झालेला आहे.

त्यातच विजय बहुगुणा हे उत्तरांचलाच्या जनतेवर केंद्राने लादलेले मुख्यमंत्री आहेत. तिथे जनतेमध्ये चांगले स्थान असलेले काँग्रेसचे नेते हरिश रावत यांना डावलून बहुगुणा यांना, गांधी-नेहरू घराण्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा देऊन मुख्यमंत्री करण्यात आलेले आहे. 

बहुगुणा कुटुंबाचा हा ऋणानुबंध पुढे जारी रहावा म्हणून या पोटनिवडणुकीत सुद्धा विजय बहुगुणा यांनी आपल्या मुलालाच उमेदवारी मिळावी, असा हट्ट धरला. तोही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवडला नाही. विजय बहुगुणा यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून रावत गटाचे पंख कापण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाही परिणाम निवडणुकीवर झालेला आहे. सत्तेवर येऊन दोन महिने होत नाहीत तोच उत्तरांचलाच्या काँग्रेस सरकारला एवढा मोठा फटका बसला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तर बरेच महाभारत घडत आहे. मुळात काँग्रेसने तिथले आपले स्थान गमावलेले आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी युती करून ते टिकविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. परंतु ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा पाठींबा काढून घेतला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या उमेदवाराने मोठी मजल मारल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पराभवाच्या छायेत असलेल्या डाव्या आघाडीचे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.

 

Leave a Comment