येडीयुरप्पा देणार भाजपला सोडचिठ्ठी

बंगळूरू: भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खुर्ची खाली करावी लागलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी आपली पक्षात घुसमट होत असल्याने डिसेंबर महिन्यात पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत सत्तेच्या किल्ल्या मिळवून देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून पक्षात त्यांचा विशेष सन्मान होता. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना पद सोडणे भाग पडले. त्यानंतरही कर्नाटकातील पक्ष संघटना आणि सरकार आपल्या मुठीत राहावे यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र पक्षाने आपल्याला वार्‍यावर सोडल्याचा आरोप ते नेहेमी करीत राहिले. कर्नाटक भाजपचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन केंद्रीय नेत्यांनी न पाळल्याचाही त्यांचा आरोप आहे.

दीर्घकाळ पक्षात महत्व न मिळाल्याने अखेर येडीयुरप्पा यांनी पक्षात आपली घुसमट होत असल्याचे कारण पुढे करून पक्ष सोडण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. आपण आपल्या निर्णयावर ठाम असून त्याचा पुनर्विचार होणार नाही; असा त्यांचा दावा आहे. मात्र हा त्यांच्या दबावतंत्राचा भाग असण्याचीच शक्यता अधिक आहे.