मानवाला बोलण्याचे आणि आवाज ऐकण्याचे जसे वरदान आहे ते मेंदूतील कांही पेशींमुळे आहे. यामुळे मानव आवाजाची नक्कल करू शकतो, आवाज काढू शकतो आणि वेगवेगळे आवाज ऐकूही शकतो. इतकेच नव्हे तर वेगवेगळे आवाज काढणे शिकू शकतो. कांही गाणार्या पक्षांतही अशा पेशी आढळतात. आता संशोधकांनी उंदरांच्या मेंदूतही मानवाच्या मेंदूतील पेशींशी साम्य असणार्या पेशी सापडल्या आहेत. ड्यूक विद्यापीठातील नॅरोबायोलॉजिस्ट एरिक जरव्हीस यांनी केलेल्या प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली आहे. उंदराला व्होकल लर्निंग ट्रेट नसतेच या गेल्या साठ वर्षांच्या संशोधकांच्या कल्पनेला त्यामुळे छेद गेला आहे.
उंदरातही सापडल्या व्होकल लर्निंग पेशी
मानवाला होणार्या अनेक आजारांवरील उपचार शोधताना त्या औषधांचा पहिला प्रयोग उंदरांवर केला जात असतो कारण मानव आणि उंदीर यांच्यातील बरीचशी जनुके समान असतात. या नव्या संशोधनामुळे स्वमग्नता किवा अॅक्झायटी डिसऑर्डर या मानवातील आत्तापर्यंत असाध्य समजल्या जाणार्या व्याधींवर करण्यात येणार्या उपचारात यामुळे क्रांती घडून येईल असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.
इतकेच नव्हे तर मानवातील भाषा उत्क्रांतीवर जे प्रयोग केले जात आहेत त्यातही या उंदरांचा उपयोग केला जात आहे. चौदा उंदरांवर असे प्रयोग केले गेले असून त्यात व्होकल लर्निंगच्या पाच फिचर्स उंदरातही असल्याचे आढळून आले आहे. अर्थात गाणार्या पक्ष्यांइतके हे फिचर्स अॅडव्हान्स्ड नाहीत मात्र ते उंदरात आहेत हाच संशोधकांसाठी मोठा शोध आहे. या दृष्टीने आता उंदरांच्या मेंदूचा अधिक खोल अभ्यास केला जाणार आहे.
