थेट परदेशी गुंतवणुकीसाठी १४ कंपन्यांना मान्यता

नवी दिल्ली दि.९ –  देशात थेट परकीय गुंतवणुकीसाठी दारे खुली केल्यानंतर केंद्राने १४ परदेशी कंपन्यांचे गुंतवणूक प्रस्ताव मान्य केले असून त्यातून देशात ११३.३५ कोटीचे भागभांडवल येणार आहे. यापैकी तीन कंपन्या औषध निर्माण क्षेत्रातील असून त्यांचीच गुंतवणूक ८१.०५ कोटी इतकी आहे. त्यासंबंधीचे पत्रक अर्थंमंत्रालयाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

हे प्रस्ताव मान्य करताना परदेशी गुंतवणूक प्रमोशन बोर्डाची शिफारस ग्राह्य धरण्यात आली असल्याचे डिपार्टमेंट ऑप इकॉनॉमिक्स अफेअर्सचे  सचिव अरविंद मायाराम यांनी सांगितले. अमेरिकेच्या डॅशटॅग ने ६८.२२ कोटींचे भागभांडवल गुंतविण्याची तयारी केली असून ही कंपनी औषध निर्माण क्षेत्रातील कंपनी आहे. अँटी हिस्टेमाईन, त्वचा, अँटीबायोटिक, कॅन्सर उपचारांसाठीची औषधे ही कंपनी तयार करते. 

प्राईम सर्जिकल सेंटर्स प्रा.लिमिटेड ही दुसरी कंपनी असून त्यांचे फ्लॅगशीप सेंटर पुण्यातच आहे. ही कंपनी १४ कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुंबईच्या निओ कॅप्रिकॉर्न प्रा.लिमि. कंपनीला भारतात पंचतारांकित हॉटेल्सच्या बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली असून अन्य कंपन्यांना जहाज बांधणी, दुरूस्ती क्षेत्रात गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली आहे असे समजते. सात कंपन्यांचे प्रस्ताव फेटाळले गेले आहेत असेही वृत्त आहे.