नक्षलग्रस्त खेड्यांना बारमाही पिण्याचे पाणी

पुणे दि.९ – पुण्यातील भूजल सर्वेक्षण विकास संस्थेच्या सहकार्याने देशाच्या ८२ नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील जिल्ह्यांना बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार असून त्यात १० हजार खेड्यांना याचा लाभ होणार आहे. आंध्र, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि बंगाल या राज्यातील हे जिल्हे असून त्यासाठी ५१० कोटी रूपये खर्च येणार आहे. या योजनेसाठी वीजेची गरज नाही तर सौर उर्जेवर चालणारे ड्युएल वॉटर पंप त्यासाठी वापरले जाणार आहेत. केंद्राच्या अर्थ, अपारंपारिक उर्जा मंत्रालयाने या संस्थेची तांत्रिक सहकार्यासाठी मदत घेतली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक प्रवीण गेडाम म्हणाले की सध्या अस्तित्वात असलेल्या हँडपंप आणि बोअरवेलवर सिगल फेज, १ हॉर्सपॉवरचे सोलर पंप यात बसविण्यात येणार आहेत. तसेच नवीन बोअरवेल घेऊन तेथेही ड्युएल कोअर सौर पंप बसविले जाणार आहेत. या पंपाच्या सहाय्याने खेचलेले पाणी टाकीत साठवून गावाला नळाद्वारे पुरविले जाणार आहे. त्यातून प्रत्येक टाकीतून ५०० जणांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यासाठी वीजेची अथवा बॅटरीची गरज नाही. अशा प्रत्येक युनिटसाठी ५ लाख १० हजार रूपये खर्च येणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील १७१६ गावात ही योजना राबविली गेली असून ती अत्यंत उपयुक्त ठरली आहे. जेथे बोअरवेल आहेत तेथेही उन्हाळ्यात १२० फूटांपेक्षा पाणी पातळी खाली गेली तर हँडपंप पाणी खेचण्यास निरूपयोगी ठरतात. त्यामुळे या दुर्गम भागातील महिलांना दिवसचे दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशा ठिकाणी सौर उर्जेवर चालणारे सबमर्सिबल पंप बसविले जाणार असून त्यातून येणारे पाणी स्पेशल वॉटर चेंबरमध्ये साठविले जाणार आहे.

हे पंप संस्थेतील अभियंत्यांनीच तयार केले आहेत. या पंपांच्या आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला गेला आहे. दिवसा हे पंप पाच हजार लिटरची टाकी भरू शकतात. या बोअरवेलचे रेन हार्वेस्टींगच्या सहाय्याने पुनर्भरणही केले जाणार आहे. विशेष म्हणजे सोलर ड्युएल पंप ढगाळ हवामानातही चालू शकतात त्यामुळे बारमाही त्यांचा उपयोग होऊ शकतो.

 

Leave a Comment