रायपूर दि.८- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या संपत्तीसंबंधी सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी वद्रा यांची पाठराखण केली आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर न्यायालयात जावे असे मत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले आहे.
पवार म्हणाले की आज ही प्रथाच पडली आहे, कुणीही उठतो आणि आरोप करत सुटतो. मग अचानक गप्प होतो व नंतर कधीतरी सरकारला न्यायालयानी चौकशी करावी अशी मागणी करतो. वास्तविक आपल्या देशात कुणाला कांही आरोप करायचे असतील तर ते थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात. केजरीवाल यांनीही तसेच केले पाहिजे.
छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना पवार म्हणाले की त्यांचा पक्ष छोट्या छोट्या पक्षांशी युती करेल मात्र त्याचा निर्णय राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून घेतला जाईल. भाजपमधून निलंबित करण्यात आलेले आणि आता स्वाभिमान मंचाचे अध्यक्ष ताराचंद साहू यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने येथे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे, त्यासंबंधी पवारांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.