नवी दिल्ली: आमच्यात मतभेद आहेत; मनभेद नाहीत; असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुरात सूर मिळविला आहे. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे जनलोकपाल विधेयकाला विरोध करणारे पहिले मंत्री असून केजरीवाल यांनी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढविल्यास आपण केजरीवाल यांचा प्रचार करू; असेही अण्णांनी स्पष्ट केले.
एकीकडे अण्णा राजकीय पक्ष स्थापण्यावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत असताना केजरीवाल यांनी मात्र अण्णांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ‘आमचे मार्ग भिन्न असले तरी ध्येय एकंच आहे’; असे सांगत केजरीवाल यांनी दिल्लीत अण्णांची भेट घेतली. या भेटीबद्दल एकेकाळच्या टीम अण्णा सदस्य किरण बेदी यांनी समाधान व्यक्त केले.
अण्णांनी दिल्लीत दाखल होण्यापूर्वी राजकारण ही घाण असल्याची टीका करून तो समाज परिवर्तनाचा मार्ग असू शकत नाही; असे निक्षून सांगितले. देशात व्यापक आंदोलनाची उभारणी करण्याची आवश्यकता व्यक्त करून अण्णांनी दिल्लीत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
अशाच भेटीसाठी एन.डी तिवारी भवन येथे आलेल्या अण्णांची केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्यासह भेट घेतली. अण्णा आणि आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत. अण्णांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठींबा आहे. एकमेकांशी सातत्याने संवाद साधून सहकार्याची आपली भूमिका राहील; असे केजरीवाल यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
अण्णा केजरीवाल यांच्या नियोजित राजकीय पक्ष स्थापनेपासून फटकून वागत असले तरीही अण्णा यांच्याबद्दल आपल्या मनात आदर कायम आहे; असा संदेश सर्वसामान्य जनतेत जावा आणि अण्णांच्या सहनुभूतीदारांचा आपल्यालाही पाठींबा राहावा; यासाठी केजरीवाल प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.