दादांचे लक्ष्य मुख्यमंत्री

सातारा: रविवारी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केल्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी निर्णय न घेता कामाच्या फाईल्स लटकावून ठेवत नाही आणि आपली स्वच्छ प्रतिमा जपण्यासाठी निष्क्रिय रहात नाही; असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली.

काही लोक कोणताही निर्णय न घेता नुसत्याच फाईल्स लटकावून ठेवतात. याचे कारणच मला काळात नाही. कदाचित त्यांना अभ्यास करायचा असेल; असा शालजोडीतील टोला पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचीही त्यांनी खिल्ली उडविली. प्रतिमा सांभाळण्याच्या नादात कामे रखडवून ठेवण्याची माझी वृत्ती नाही. मी काम पूर्ण होण्याला प्राधान्य देतो; असे पवार म्हणाले.

आपला रोख मुख्यमंत्र्यांकडे आहे काय; असे विचारले असता पवार म्हणाले की; मी कोणाचे नाव घेत नाही. मी कामे रखडवत नाही. माझी कार्यपद्धती ढिलेपणाची नाही; एवढेच मला म्हणायचे आहे.

दरम्यान; अजित पवार यांनी काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलेला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पवार यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. अजित पवारांनी आपल्या आक्रमकपणाला आवर घालावा; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment