रेल्वे मालवाहतूक आणि वातानुकूलित सेवा महागणार

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसकडून दीर्घ काळाने रेल्वे मंत्रालयाचा ताबा मिळालेल्या कॉंग्रेसने रेल्वेच्या मालवाहतूक आणि वातानुकूलीत श्रेणीच्या प्रवासी सेवेवर सेवाकर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दि. १ ऑक्टोबर पासून अमलात येणार असून त्यासाठी ३.८ टक्के सेवाकर आकारला जाणार आहे.

सेवाकर आकारण्याच्या अंमलबजावणीसाठीचा निर्णय नव्याने रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी घेतलेले सी. पी. जोशी आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच यासाठी अधिसूचना काढली जाणार असून प्रथम वर्ग वातानुकूलित, एक्झीक्युटीव्ह श्रेणी, एसी २ टायर, एसी ३ तयार आणि एसी चेअर कार या वर्गांसाठी हा सेवाकर लागू असेल; असे रेल्वे सूत्राने सांगितले.