
पुणे: दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रयोगशील दिग्दर्शक संजय सूरकर यांचे पुण्यात हृदयरोगाने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते.

पुणे: दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रयोगशील दिग्दर्शक संजय सूरकर यांचे पुण्यात हृदयरोगाने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते.
‘लाठी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सूरकर पुण्यात होते. चित्रीकरण सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांना रत्ना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी विख्यात अभिनेते सचिन खेडेकर त्यांच्याबरोबर उपस्थित होते. मात्र अल्पावधीतच त्यांची प्राणज्योत मावळली.
पुण्यातील नाट्य परिषदेच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सिने, नाट्य सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकट राजा, सातच्या आत घरात, तू तिथे मी, आनंदाचे झाड, सुखांत, मास्तर एके मास्तर, सखी, आपली माणस हे त्यांचे चित्रपट गाजले. स्टँडबाय हा हिंदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. त्यांनी अनेक मराठी दूरचित्रवाणी मालिकांचेही दिग्दर्शन केले. अवंतिका, सुकन्या, ऊन पाऊस या त्यांच्या मालिका रसिकप्रिय ठरल्या.