लोका सांगे ब्रम्हज्ञान…

नवी दिल्ली: ‘पैसे झाडाला लागत नाहीत;’ असे सांगत अनुदान कपात करण्याचे समर्थन करणार्‍या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील मंत्र्यांच्या दौर्‍यांच्या खर्चात मात्र विक्रमी वाढ करण्यास सरकारने मागे पुढे पाहिले नाही. मंत्र्यांच्या दौर्‍यांसाठी सन २०११-१२ या आर्थिक वर्षात तब्बल ६७८ कोटी रुपये खर्च झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ १२ पट आहे; अशी माहिती केंद्रीय गृह विभागानेच माहितीच्या अधिकारात दिली आहे.

सुभाषचंद्र गोयल यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली मंत्र्यांच्या दौर्‍याच्या खर्चाची आकडेवारी गृह विभागाने दिली आहे. सन २०१०-११ या वर्षात दौर्‍यांचा खर्च ५६ कोटी १६ लाख रुपये होता. यावर्षी त्यात १२ पट वाढ झाली आहे. मंत्र्यांच्या दौर्‍यासाठी सरकारी खजिन्यातून या वर्षात ६७८ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये खर्च झाले आहेत. प्रत्यक्षात या वर्षी मंत्र्यांच्या दौर्यासाठी ४६ कोटी ९५ लाख खर्च अपेक्षित होता.

सन २००९-१० हे निवडणूक वर्ष असूनही त्यावर्षी दौर्‍यांचा खर्च ८१ कोटी ५४ लाख एवढाच होता. मग याच वर्षी या खर्चात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली; असा सवाल गोयल यांनी केला आहे. मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर विदेश दौरे करण्यास परवानगी देऊ नये आणि मंत्र्यांनी सर्वसाधारण वर्गातून प्रवास करून राहणीमान साधे ठेवावे; अशी मागणीही त्यांनी केली.

यावर्षी झालेल्या प्रवास खर्चाची चौकशी करून अनाठायी खर्च करणाऱ्या मंत्र्यांकडून तो वसूल करावा; अशी मागणीही गोयल यांनी केली आहे.