१५ आक्टोबरपासून पेट्रोल पंप आठ तासच खुले

नवी दिल्ली दि.२७ – सरकारने पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील कमिशन वाढवून न दिल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या पेट्रोलियम पदार्थ वितरकांनी १५ ऑकटोबरपासून दिवसातले आठच तास पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पेट्रोलियम मंत्रालयाला दिला असून तसे पत्र कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम डिलर्स तर्फे पाठविण्यातही आले आहे. देशभरातील ७० हजाराहून अधिक डिलर्स यात सहभागी होणार आहेत असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार जुलै ११ मध्ये सरकारने कमिशन रिव्हीजन करून प्रतिलिटर पेट्रोल मागे १ .४९९ रू.वाढ केली होती तर हेच कमिशन डिझेलसाठी ०.९ ने वाढविण्यात आले होते. मात्र मनुष्यबळावर होत असलेला खर्च आणि वीजेचे वाढलेले दर यामुळे पेट्रोल डिलर्सना इतक्या कमी कमिशनमध्ये व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे आणि बहुतेक डिलर्स आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर उपाय म्हणजे मनुष्यबळ आणि वीजेचा कमी वापर हाच असल्याने १५ आक्टोबरपासून पेट्रोल पंप आठ तासच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.