चंदीगड: राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या अकाली दलाने आघाडीच्या भूमिकेला छेद देत रिटेल क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला पाठींबा जाहीर केला आहे. पंजाब सरकार या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी बुधवारी जाहीर केले.
एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली रालोआ थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करीत आहे; तर त्याच आघाडीतील अकाली दलाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचा निर्णय शेतकरी आणि व्यापार यासाठी फायदेशीर असल्याचे मत बादल यांनी व्यक्त केले. बादल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांना पत्र लिहून या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना स्थानिक दुकानदारांच्या हिताचा विचार व्हावा; अशी सूचनाही त्यांनी केली. अकाली दलाने यापूर्वी याच मुद्द्यावरून केंद्र सरकारला विरोध केला होता.
पंजाब मंडी बोर्डाचे अध्यक्ष अजमेरसिंग लाखोवाल यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे.