राष्ट्रवादीचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

मुंबई: अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अखेर अपेक्षेप्रमाणेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिकार देऊन संपली. शरद पवारांनीही अपेक्षेप्रमाणे समस्येचे संधीत रुपांतर करून राज्यातील; खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत प्रश्नाला ‘राष्ट्रीय’ बनविले आहे. कारण आता गुरुवारी शरदराव दिलेत पोहोचल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे शिष्टमंडळ बैठक घेऊन या समस्येचा तोडगा काढणार आहेत. या चर्चेत पवार ‘आणखी काही’ आपल्या पदरात पाडून घेण्याची संधी साधतील; यात शंका नाही.

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बुधवारी पार पडली. केंद्रातील शरद पवारांचे उजवे हात आणि वादग्रस्त मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अशा बैठकीची आवश्यकता नाही; असा संकेत देऊनही ही बैठक पार पडली. सुरुवातीला या बैठकीत केवळ माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि बैठक संपेल; अशा कंड्या पिकविण्यात आल्या. मात्र ऐन वेळी या बैठकीत दोन राजकीय ठराव संमत झाले. एक सर्व आमदारांचा अजित पवारांना पाठींबा असल्याचा; दुसरा त्यांनी राजीनामा मागे घेण्याच्या विनंतीचा. मंगळवारी आपल्या पाठोपाठ राष्ट्रवादी मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावून आणि बुधवारी या बैठकीच्या निमित्ताने पक्षाच्या सर्व आमदारांचा आपल्याला पाठींबा असल्याचा ठराव संमत करवून दादांनी आपले शक्ती प्रदर्शन केले. कोणत्याही वेळी आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याच्या तयारीत असलेले अपक्ष आमदारही मोठा त्याग करून आपल्या पाठीशी असल्याचा देखावाही दादांनी केला. या बैठकीत सर्वाधिकार शरदरावांना देण्यात आले असले तरीही आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पवारांनी वेळ देण्याच्या मागणीची मेखही मारून ठेवण्यात आली.

मात्र या शक्ती प्रदर्शनातून सध्या तरी दादांच्या पदरात फारसे काही पाडून घेण्यासारखे नाही. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदाची मागणी ते करू शकत नाहीत. केवळ आपल्यावर झालेल्या आरोपांचीही संधी साधून भाबड्या जनतेच्या नजरेत साजूक बनावे; शिवाय जमलेच तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची थोडी का होईना विचलित करावी; असे दादांचे उद्देश असावे. याशिवाय महत्वाचा म्हणजे आपल्याच काकांना महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपणच दादा असल्याची जाणीव करून देण्याचा!हे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे उद्देश दादांनी बर्यापैकी साधले असेच म्हणावे लागेल.

मात्र शरद पवारांनी यापुढे जाऊन याचा निर्णय केंद्रीय काँग्रेस पक्षाला घ्यायला लावण्याचा डाव टाकून यापुढचे राजकारण साधले आहे. मुळातच आर्थिक सुधारणांसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे तृणमूलचा पाठिंबा गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या आणि मुलायम आणि मायावती यांच्यासारख्या बेभरवशी नेत्यांच्या पाठींब्यावर तरलेल्या केंद्र सरकारला खिंडीत गाठण्याची संधी शरद पवारांनी दादांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने गाठायचे ठरविले आहे. अन्यथा दादांच्या राजीनाम्याची चर्चा करून मार्ग काढण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसची काही भूमिका असण्याचे कारण नाही.

अजित पवारांना आरोपांची एवढी फिकीर असती तर त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला असता. मात्र या राजीनामा नाट्याचे टायमिंग पाहता एकीकडे एकमेकांना आपली ताकद दाखविताना मी मारल्यासारखे करतो; तू रडल्यासारखे कर हाच पवार काका पुतण्यांचा डाव असावा; या शंकेला वाव आहे.

Leave a Comment