राजीनाम्याचा विषय संपला: शरद पवार

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा विषय आता संपला आहे; असे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारतात की नाही; याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून चौकशी नि:पक्षपाती होण्याबद्दल विश्वास वाटावा म्हणून अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला आहे. हा राजीनामा स्वीकारावा अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

आम्हाला अस्थैर्य निर्माण करण्यात स्वारस्य नाही. आम्हाला जनतेला स्थैर्य प्रदान करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा केंद्रातील सरकार अडचणीत येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ; असे पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल; मात्र इतर मंत्र्यांनी भावनेच्या भरात दिलेले राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत. त्यांना राज्यात काम करावेच लागेल; असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.