अग्नी- ३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालासोर, दि. २२ –  भारताने लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू अग्नी -३ या क्षेपणास्त्राची शुक्रवारी यशस्वी चाचणी केली. सुमारे तीन हजार किलो मीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. दोन दिवसांपूर्वी अग्नी – ४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी ओडिशातील व्हीलर बेटावर दुपारी एक वाजता या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पूर्णतः देशी बनावटीच्या, जमिनीवरून हवेत मारा करण्यात येणार्‍या  या क्षेपणास्त्राची १. ५ टनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने लष्कराने ही चाचणी घेतली. क्षेपणास्त्राची मारक्षमता तपासण्यासाठी घेण्यात आलेली अग्नी – ३ मालिकेतील ही पाचवी चाचणी होती.  या क्षेपणास्त्राची उंची १७ मीटर, रुंदी दोन मीटर आणि प्रक्षेपणाच्या वेळी याचे वजन सुमारे ५० टन एवढे होते. हे क्षेपणास्त्र हायब्रिड नेव्हिगेशन गाईडन्स आणि कंट्रोल सिस्टीमसोबत अॅडवान्स्ड ऑन बोर्ड कॉम्प्युटरनेही सज्ज आहे. अग्नी -३ ची मालिका यशस्वी ठरली असून, मोहिमेची सर्व उद्दिष्टये पूर्ण झाल्याचे संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने म्हटले आहे. अग्नी – ३ च्या विकासासाठी प्रथम ९ जुलै २००६ चाचणी घेण्यात आली होती ; पण ती अयशस्वी ठरली होती. त्यांनतर १२ एप्रिल २००७, ७ मे २००८ आणि ८ फेब्रुवारी २०१० रोजी अग्नी – ३ ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.