
इस्लामाबाद, दि.२१ – अमेरिकेतल्या इस्त्रायली ज्यू निर्मात्याने बनवलेल्या ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम‘ या वादग्रस्त चित्रपटाविरोधातील निदर्शनांचे लोण लिबिया, इजिप्त, येमेननंतर आता पाकिस्तानात पोहचले आहे.

इस्लामाबाद, दि.२१ – अमेरिकेतल्या इस्त्रायली ज्यू निर्मात्याने बनवलेल्या ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम‘ या वादग्रस्त चित्रपटाविरोधातील निदर्शनांचे लोण लिबिया, इजिप्त, येमेननंतर आता पाकिस्तानात पोहचले आहे.
अमेरिकेविरोधात निदर्शने करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पाकिस्तानी नागरिक इस्लामाबादच्या रस्त्यांवर उतरले होते. डिप्लोमॅटिक एरियामध्ये सुरु असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी यावेळी लष्कराकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यावेळी निदर्शकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक केली.
दरम्यान, इस्लामचा अपमान करणारी कोणतीही कृती भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली खपवून घेतली जाणार नाही, असे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राना कळवले आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान-की-मून यांच्यासह अन्य पदाधिकार्यांना पाकिस्तानचे यूएन राजदूत अब्दुल्लाह हुसेन हरून यांनी पत्र पाठवले आहे. ’इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’ या माहितीपटाचे ट्रेलर यू-ट्यूबवर प्रसारित झाल्यानंतर अनेक मुस्लिम राष्ट्रात हिंसक निदर्शने सुरू आहेत. मून यांनी या हिंसाचाराचा निषेध केला होता. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र हा चित्रपट हे हिंसाचारासाठी शोधलेले निमित्त आहे, असे म्हटले आहे.