अॅपल शेअरने ओलांडली ७०० डॉलर्सची पातळी

अॅपलच्या आयफोन पाचच्या बुकींगला२४ तासात मिळालेला प्रतिसाद पाहून शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटले. अॅपलच्या शेअरने मंगळवारी प्रथमच ७०० डॉलर्सचा टप्पा पार करून ७०२.३३ ची पातळी गाठली. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ६५८ बिलीयन डॉलर्सवर पोहोचले आहे.

या नव्या उच्चांकाने कंपनीने जगातील व्हॅल्यूएबल पब्लीक कंपनी बनण्याचा मान मिळविला आहे. २००७ मध्ये गुगलच्या शेअरने अशीच ७०० डॉलर्सची पातळी गाठली होती. आज गुगलच्या शेअरची किमत ७१२ डॉलर्सवर आहे. अॅपलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आयफोन पाचची विक्री येत्या तिमाहीत २७० लाखांवर जाण्याची अपेक्षा असून यापूर्वी कंपनीने २६० लाख विक्रीचा अंदाज केला होता. आयफोन पाचला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे १० लाखांनी विक्री अधिक होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज याचे ५ आकटोबर २०११ ला निधन झाल्यानंतर अॅपलच्या शेअरमध्ये तब्बल ८६ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

अॅपलचा पहिला आयफोन २००७ मध्ये बाजारात आला होता. पहिल्या सर्व मॉडेल्सपेक्षा आयफोन पाचचे मॉडेल अधिक सुंदर असून त्याला चार इंची डायगोनल स्क्रीन देण्यात आला आहे. या आधीच्या मॉडेल्समध्ये तो साडेतीन इंची होता.