आशियाई देशांसाठी यूएई व्हिसा नियम कडक

युनायटेड अरब अमिराती ने पर्यटन, व्हिजिट व  कॉन्फरन्स व्हिसासाठीचे नियम अधिक कडक केले असून या प्रकारचा व्हिसा मागणार्‍याचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असले पाहिजे अशी अट घातली आहे.  विशेष म्हणजे अमिरातीत रोजगारासाठी ज्या देशातून अधिक लोक पाठविले जातात त्या भारत व पाकिस्तान, बांग्ला देश, फिलिपिन्स व श्रीलंका या आशियाई देशातील नागरिकांसाठीच हे नियम लागू होणार आहेत. अमिरातीत गेल्या कांही दिवसांत परदेशातून आलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन हे नियम कडक केले गेले असल्याचे सांगितले जात आहे. अरब देशांतील नागरिक आणि रहिवासी यांच्या संरक्षणाच्या दृष्टीतून हा निर्णय घेतला गेला आहे.

पर्यटन व्हीसा सर्वसाधारणपणे हॉटेल्स व प्रवासी एजंटकडून काढून दिले जातात. फेडरल रेसिडेन्सी डिपार्टमेंटने वरील देशातून येणार्‍या ब्लू कॉलर वर्कर्ससाठी नियम अधिक कडक केले असून इलेक्ट्रिशियन, पाईप फिटींग करणारे, वाहन चालक, शेतकरी, शिंपी आणि सफाई कामगार यांच्याबाबत हे नियम काटेखोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत. या लोकांना व्हीसा देताना पदवीच्या डीग्री बरोबरच त्यांचे राऊंड ट्रीप तिकीट काढलेले आहे का, हॉटेलचे बुकींग आहे का आणि इथे राहण्यासाठी पुरेसा पैसा आहे का हेही तपासले जाणार आहे.
 
परदेशातून पर्यटक म्हणून येणारे अथवा कामगार म्हणून येणारे अनेक मानवी तस्करी, गुन्हेगारीसारख्या प्रकरणात अडकलले असतात तर अनेकजण भीक मागण्यासाठीच येतात व येथे रूग्णालये, रस्त्यांवर भीक मागतात असेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.

Leave a Comment