अजून निवृत्तीचा विचार नाही: विश्वनाथन आनंद

चेन्नई:सध्या निवृत्तीचा कोणताही विचार नसून सन २०१४ चे विश्व विजेतेपदही आपल्याकडेच असावे; अशी इच्छा बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांनी व्यक्त केली.

आनंद सध्या ४२ वर्षाचे असून जगातील आघाडीच्या बुद्धिबळपटूमध्ये सर्वाधिक वयाच्या १० खेळाडूंमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. युक्रेनचे वॅसिली इव्हानचुक हे आनंद यांच्यापेक्षा वयाने अधिक आहेत. आनंद यांनी तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. वीस वर्षाच्या बुद्धीबळ कारकिर्दीत आनंद यांनी अनेक बड्या खेळाडूंना पाणी पाजले. मात्र इस्त्रायलचे बुद्धिबळपटू बोरिस गेलफँड यांना आनंद मोठा प्रतिस्पर्धी मानतात. बोरिस अतिशय शिस्तबद्ध आणि पूर्णत: व्यावसायिक खेळाडू असल्याचे त्यांचे मत आहे. यावर्षी मे महिन्यात बोरिस यांना पराभूत करून आनंद यांनी विश्वविजेतेपदाचा मान प्राप्त केला.

बुद्धिबळात सतत काहे तरी नवीन शिकण्याचा आपला प्रयत्न असतो आणि आव्हानांना सामोरे जायला आपल्याला आवडते; असेही आनंद सांगतात.