भारताच्या शस्त्रांस्त्रांना अमेरिकेसह जगभरातून मागणी

नवी दिल्ली /पुणे दि.१०- जगातील सर्वात मोठा शस्त्रखरेदी करणारा देश म्हणून ओळख असलेल्या भारताने आता शस्त्रास्त्र निर्यातीतही भरारी घेतली असून जगभर सर्वाधिक शस्त्रे निर्यात करणार्‍या अमेरिकेनेही भारताच्या शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लष्करी संशोधन संस्था आणि संरक्षण मंत्रायलाच्या अधिपत्याखालील विकास आणि संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी बनविलेल्या अर्जून टँक, ब्रह्मोस, रडार, स्फोटकांचा माग काढणारी कीट अशा अनेक संरक्षण शस्त्रांना जगभरातील देशांकडून मागणी येत आहे. भारतानेही या शस्त्रांस्त्रांच्या निर्यातीची तयारी दाखविली असली तरी प्रथम देशाची संरक्षण सिद्धता पूर्ण केल्यानंतरच निर्यातीची सुरवात केली जाणार आहे असेही समजते.

संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतीय संरक्षण उपकरणे आणि हार्डवेअरला मागणी असून अमेरिकेने पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबने संशोधित केलेल्या स्फोटकांचा अचूक शोध घेऊ शकणार्‍या कीटमध्ये  रस दाखविला आहे. हे उपकरण अतिशय हलके, हाताळण्यास सोपे आणि कांही क्षणांत लपविलेल्या स्फोटकांचा शोध घेऊ शकते तसेच स्फोटकांचे रासायनिक विश्लेषणही करू शकते. भारतीय लष्कर, बॉम्बशोधक पथके, निमलष्करी दले, तसेच महाराष्ट*, आंध्र, गुजराथ, आसाम, तमीळनाडू राज्यांचे पोलिसही हे उपकरण वापरत आहेत. एखाद्या जागी स्फोटके पेरलेली असतील तर या उपकरणाच्या सहाय्याने स्फोट होण्याअगोदरच या स्फोटकांचा माग काढता येतो. अमेरिकन लष्कर व होमलँड सिक्युरिटीने या उपकरणात रस दाखविला आहे.

पाच मिनिटात उभे करता येणारे पोर्टेबल रडारही जगभरातील देशांच्या औत्सुक्याचा विषय बनले असून व्हिएतनामने ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मागणी केली आहे. अर्जुन दोन रणगाड्याला अनेक देशांतून विचारणा झाली असून हा रणगाडा व ब्रह्मोससाठी चिली, द.आफ्रिका, ब्राझील, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांकडून मागणी आहे. अग्नी पाच मिसाईलबाबतही अनेक देशांकडून विचारणा होत असल्याचे समजते.