मिल्क मॅनचे निधन

भारताची विविध क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून  अनेक लोक झिजले आहेत. त्यातले नेते तेवढे आपल्याला माहीत आहेत पण पायातले दगड माहीत नाहीत. असाच एक पायातला दगड म्हणजे भारतातल्या धवल क्रांतीचा पाया घालणारे डॉ. वर्गीज कुरीयन. त्यांचे आज निधन झाले.  कुरीयन हे मुळातले केरळातले राहणारे पण त्यांनी गुजरातेत येऊन धवल क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी पूर्ण देशाचे चित्र बदलून टाकणारा एक प्रयोग केला. त्यांनी १९४९ साली या प्रयोगाचा पाया घातला. ज्या काळात त्यांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा हा प्रयत्न केला त्या काळात शेतकर्‍यांत व्यावसायिक वृत्तीच नव्हती.  त्यांना दुधाचा धंदा देणे ही बाबच मोठी अवघड होती. मुळात लोकांतही दूध विकत घेण्याची फार ऐपत नव्हती. देशातल्या बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती अतीशय कमी होती. त्या काळात त्यांनी धाडसाने हा उपक्रम हाती घेतला. 

याच काळात काय पण नंतरची १० ते १५ वर्षे दूध विक्री हा संघटित व्यवसाय होऊ शकेल असे कोणाला वाटत नव्हते पण कुरियन यांना तसा विश्वास वाटत होता. त्यांनी काम सुरू केले तेव्हा या सहकारी संस्थेचे सदस्य होते ‘दोन’. दोन सदस्यांपासून सुरूवात करून त्यांनी हा वटवृक्ष किती मोठा केला आहे हे आपण पहातच आहोत. त्यांनी अमूलला जगात ख्याती मिळवून दिली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रयोगाची सराहना केली होती. जय जवान जय किसान असा नारा देणार्‍या पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी तर त्यांना सक्रिय मदत केली. कुरियन यांच्या कौशल्याचा आणि नेतृत्वाचा फायदा देशाला झाला पाहिजे या कल्पनेतून त्यांनी कुरियन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड  (एनडीडीबी) या संस्थेची स्थापना केली. कुरियन यांनी या संस्थेच्या माध्यमातून गुजरातेच्या धर्तीवर अन्यही राज्यांत दुग्ध व्यवसायाला चालना दिली.त्यांनी देशभरात धवलक्रांती अर्थात ऑपरेशन फ्लड असा उपक्रम राबवला. त्यातून महाराष्ट्रातही श्वेत  क्रांती झाली. तिलाच दुधाचा महापूर असे नाव देण्यात आले होते.

२००० साली देशात एवढे दुग्धोत्पादन झाले होते की भारत हा दुग्धोत्पादनात जगात दुसर्‍या क्रमांकाचा देश ठरला होता आणि देशातले दुधाचे उत्पादन   जगातल्या दूध उत्पादनाच्या १७ टक्के असल्याचे दिसून आले होते. कुरियन यांनी गुजरातेतही दूध उत्पादन करणार्‍या सहकारी संस्थांचा महासंघ स्थापन केला होता. त्या संघाचे ते ३३ वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी अमूल या ब्रँडलाही जागतिक ख्याती मिळवून दिली होती. कुरियन यांचे हे कार्य गुजरातेत समृद्धी आणण्यास कारणीभूत ठरले. आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातने शेतीत किती प्रगती केली आहे याच्या बर्‍याच बढाया मारत असतात. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे पण, तिथल्या शेती व्यवसायाला स्थैर्य मिळाल्यामुळेच तिथली शेती सुधारली आहे. हे स्थैर्य तिथल्या शेतकर्‍यांना उपलब्ध झालेल्या दुग्ध व्यवसायाने मिळाले आहे. आज गुजरातेत दुग्धोत्पादक संस्थांचे ३२ लाख शेतकरी सदस्य आहेत.

शेती व्यवसायात प्रगतीची मोठी झेप घेणे हे काही क्षणात घडणारे काम नाही. त्यासाठी प्रदीर्घ काळ काम करावे लागते.  २००२ साली मोदी मुख्यमंत्री झाले आणि २००८ साली राज्यात कृषि क्रांती झाली असे कधी होत नाही. गुजरातेतल्या या परिवर्तनाचा पाया १९४० च्या त्या दशकात घातला गेला आहे आणि त्यातूनच ही क्रांती साकारली आहे. शेती व्यवसाय फार बेभरवशाचा असतो. त्याला शेतकरी कंटाळला की तो आत्महत्या करतो. विदर्भातले शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करतात यामागे ही अनिश्चितताच असते. या आत्महत्यांच्या कारणांवर अनेक समित्या बसल्या आणि अनेक तज्ञांनी त्याची कारणमीमांसा केली पण शेतकर्‍यांना जोड धंदे मिळाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत अशा निष्कर्षाप्रत यावे लागले. हा निष्कर्ष खरा आहे हे गुजरातेतल्या शेती वरून आणि त्याला प्राप्त झालेल्या दुग्ध व्यवसायाच्या आधारावरून दिसून आले आहे.  अर्थात या व्यवसायाकडे त्या दृष्टीने कोणी पहात नाही हा आपल्या देशातला मोठा दोष आहे. वर्गीस कुरियन यांनी दुग्ध व्यवसाय यशस्वी केला पण मुळात त्यांनी शेती आणि शेतकर्‍यांना स्थैर्य प्राप्त करून दिले आहे.  

डॉ, वर्गीस कुरियन यांनी हे सहकार तत्त्वावर शक्य करून दाखवले आहे. हे त्यांचे सहकार क्षेत्रालाही मोठे योगदान आहे. पण त्यांनी हे यश मिळवताना एक गोष्ट केली आहे ती अनेकांनी अनुकरण करावी अशी आहे. त्यांनी दुग्ध व्यवसाय करताना केवळ दूध विकण्यावर भर दिला नाही. त्यांनी दुधाचे अनेक प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करून त्यांची विक्री केली. शेती माल कच्च्या स्वरूपात विकला जातो तेव्हा त्याला किंमत येत नाही पण तोच माल प्रक्रिया करून विकला की त्याची किंमत वाढते. हे व्हॅल्यु अॅडिशन फार महत्त्वाचे आहे.  कुरियन यांनी केवळ दुधाचा धंदा केला नाही तर प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करून त्यातून भरपूर नफा कमावला. त्या नफ्याचा वाटा त्यांनी  शेतकर्‍यांना दिला. हे त्यांचे वैशिष्ट्य होते.   

Leave a Comment