मिल्क मॅन वर्गीस कुरीयन यांचे निधन

आणंद दि.९- भारतातील धवल क्रांतीचे प्रणेते डॉ.वर्गीस कुरियन यांचे रविवारी सकाळी मुळजीभाई पटेल युरॉलॉजी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गुजराथ को ऑप. मिल्क फेडरेशन सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.

एकेकाळी दुधाचे दुर्भिक्ष्य असलेल्या भारताला आपल्या अमाप परिश्रमांनी आणि अत्यंत कुशल नेतृत्वाने जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश असे नामांकन मिळवून देणार्‍या कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक ही सार्थ बिरूदावली प्राप्त झाली होती. अमूल डेअरी ब्रँड घरोघरी पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १ कोटी शेतकर्‍यांची सहकारी सोसायटी स्थापन करून कुरियन यांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचा खरा हक्क मिळवून देण्याची मोठीच कामगिरी पार पाडली होती. तसेच जगात सर्वात प्रथम म्हशीच्या दुधापासून दूध पावडर बनविण्याचा पराक्रम ही त्यांच्या नावावर आहे.

१९४९ साली कुरियन गुजराथेतील आणंद येथे आले तेव्हा केवळ २८ वर्षांचे होते. देशात शेतकर्‍यांच्या सहकारी सोसायट्या स्थापन व्हाव्यात यासाठी अविरत प्रयत्नशील राहिलेल्या कुरियन यांचा डेअरी व्यवसायाचे खरे हक्कदार दूध उत्पादक शेतकरीच आहेत यावर गाढ विश्वास होता. भारतात एकेकाळी दुधाचे दुर्भिक्ष्य असताना कुरियन यांनी १९५५ सालातच दररोज वीस हजार दूध उत्पादनाची पातळी गाठून दाखविली होती. त्यानंतर आपला स्वतःचा ब्रँड सहकारी सोसायटीला हवा या भावनेतून अमूलची स्थापना करण्यात आली. हे नांव आणंद मिल्क युनियन लिमिटेड चा शॉर्टफॉर्म जसे होते तसेच अमूल म्हणजे ज्याचे मोल करता येणार नाही असे असाही त्याचा अर्थ होता. गुजराथ मध्ये दूध उत्पादनाचा प्रयोग प्रचंड यशस्वी झाल्यानंतर हा प्रयोग कुरियन यांनी देशभर राबविला आणि आज देशातील १ कोटी शेतकरी २०० डेअर्‍यांच्या माध्यमातून दररोज २ कोटी लिटर दुध उत्पादन करत आहेत.

कुरियन यांचा ९० वा वाढदिवस २६ नोव्हेंबरला आणंद येथेच मोठ्या थाटात साजरा करण्यात आला होता. तेव्हा अतिशय प्रामाणिकपणे कुरियन यांनी ‘ मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही‘ असे सांगितले होते.कुरियन यांच्या मागे पत्नी आणि १ मुलगी असा परिवार आहे.