किंगफिशर विमानकंपनीला झालेल्या कर्जापोटी तसेच अन्य आर्थिक जबाबदार्यांपोटी कंपनीचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी ५९०४ कोटी रूपयांची हमी दिली आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षातील या हमीवर मल्ल्या यांना कोणतेही कमिशन देण्यात आलेले नाही. त्यांना कर्ज देणार्यांनी कमिशन देण्यास विरोध केल्याचे कारण त्यामागे देण्यात आले आहे.
गतवर्षी मल्ल्या यांनी ६१५६ कोटी रूपयांची हमी दिली होती आणि त्यापोटी त्यांना ५१ कोटी रूपये कमिशन मिळाले होते. यंदाच्या वर्षात हमीची रक्कम कमी दिसत असली तरी किंगफिशरच्या अन्य होल्डिंग कंपन्या व असोसिएट कंपन्यांचा तोटा मात्र वाढलेला दिसून येत आहे. किंगफिशरचा तोटाही १०२७ कोटींवरून यंदा दुप्पट म्हणजे २३२८ कोटी रूपयांवर गेला आहे.
सप्टेंबरच्या २६ तारखेला कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून त्यानिमित्ताने भागधारकांना पाठविलेल्या अहवालात यंदाच्या वर्षात मल्ल्या यांना पेमेंट दिले गेले नसल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र कंपनीचे सीईओ संजय अगरवाल यांचा पगार २.१२ कोटींवरून ४.०१ कोटी करण्यात आला आहे. विमान कंपनीच्या पगारावर होणार्या खर्चात कपात दिसत असली तरी ती प्रामुख्याने कर्मचार्यांची संख्या कमी झाल्याने आहे. गतवर्षात १६५१ कर्मचार्यांनी किंगफिशरची नोकरी सोडली आहे. कंपनीने कर्ज घेताना हमी म्हणून ट्रेडमार्क, गुडविल, मुव्हेबल अॅसेटस, क्रेडीट कार्ड आणि अन्य मालमत्ताही दाखविली आहे.