पड र पाण्या…….

मराठवाडा फार तान्हेला होता. काय होणार याच्या काळजीनं जीव तुटत होता. धरणांत तर १० टक्केच पाणी होतं. आता वाढायला लागलं आहे.  आधी  जनावरं कशी जगवावी हे कळत नव्हतं. जित्राबं जगवायचा कसोशीनं प्रयत्न केला पण ज्याला ते जमलं त्यांचीच जनावरं जगली. बाकीच्यांनी खाटकाची भरती केली. आडा विहिरीतलं तर पाणी आटलंच होतं पण डोळ्यातलंही आटलं होतं. जनावराचं दावं खाटकाच्या हातात देताना डोळ्यातही पाणी येत नव्हतं. दर दोन तीन वर्षाला असं व्हायला लागलंय. शेतीमालाच्या किमती वाढल्या की लोकं कोकलतेत. धान्य महाग झालं म्हणतेत. भाज्या महाग झाल्या म्हणतेत. तसं काही झालं की, शेतकर्‍यांच्या नावानं बोटं मोडतेत. पण काहीही कितीही महाग झालं तरी त्यातलं शेतकर्‍यांना काहीही मिळत नसतंय याची त्यांना काही कल्पनाच नसतीय. लोक शेतकर्‍यांच्या नावानं बोटं मोडणार आणि शेतकरी गबर झाले म्हणून उसासे टाकणार पण इकडं शेतकर्‍याची पोटं खपाटीला गेलेली अन जनावरांचे डोळे खोल गेलेले.  त्यात काहीच बदल नाही.
 
दुष्काळ पडला की सरकारी कामगार अन् इंजिनेरं तेवढी खुष असतेत. कारण दुष्काळ त्यांना मानवतो. दुष्काळाने शेतकरी मरीनात का पण इंजीनेरं मात्र मोप पैसे खातेत अन् पेतेतभी. तेच्यानं त्यांची पोटं मात्र पुढं येतेत.शेतकर्‍यांच्या नावानं कोटी कोटी रुपयांचे आकडे उधळतेत पण त्यातला दमडाबी शेतकर्‍याच्या पदरात पडत नाही. सगळंच सोंग न्  काय ! शेतकरी कसा असतो. कसा जगतो आणि तेचं हाल काय असत्यात त्याची कोणाला म्हणजे कोणालाच कल्पना नसते. ज तो आपला शेतकर्‍यांच्या नावानं ओरडतो. गळे काढतो. खुद्द शेतकरी कसल्या हालात दिवस काढतोय याची कुनाला चिताय नाही अन् काळजीही नाही. जो तो शेतकर्‍याला पिळायलाच बसलेला. मराठवाड्यात पाण्याचा टिपूस नाही. धरणांतले पाणी १० टक्क्यांच्या पातळीला गेलेलं. कधी भरणार कुणाला म्हाईत पण आता जरा पाऊस सुरू झालाय. त्यानं जोर धरलाय. जरा बरं वाटतंय.न्हाई तर काय ? पावसाविना शेतकरी कसा जगंल ? पावसाने दगा दिला की त्याचा जीव खालीवर होणारच. आता आता धरणाचा लई हिसाब सांगायलेत. कारण धरणात पाणी असंल तरच ऊस पिकणार. म्हणून शेतकरी धरणातल्या पाण्याकडे पहात असतो.
   
असं असलं तरीही आणि धरणं भरली तरी शेतकर्‍यांना काही उपयोग नाही कारण धरणातल्या पाण्यावर आता शेतकर्‍यांचा हक्क राहिलेला नाही. त्याला धरणं बांधताना नुसती स्वप्नं दाखवलेली. धरणातलं पाणी आधी गावातल्या लोकांना प्यायला. मग  कारखान्यांना आणि राहिलंच तर मग शेवटी शेतीला. मग धरणात पाणी भरल्याचं त्याला काय कौतुक ? आसमान आणि सुलतान अशा दोन्ही बाजूंनी नाडला जातो तो शेतकरीच. आधी तर पाऊस मुलखाचा छळवादी. भारतातला शेतकरी शेती करतो म्हणजे पावसाशी जुगार खेळतो. पावसाने हुलकावणी दिली तर शेतकरी हरतो आणि उद्ध्वस्त होतो. एखाद्या वर्षी पीक अजिबात न येणे म्हणजे काय? याची कल्पना शहरातल्या लोकांना येणार नाही. तुलनेने त्यांची स्थिती चांगली असते. सरकारी कर्मचारी किवा अगदी खाजगी कर्मचारी सुद्धा पगाराची तारीख हुकली तर किती हवालदिल होतात. परंतु शेतकर्‍यांची अवस्था फार वाईट असते. त्याला त्याचे उत्पन्न नेहमी हुलकावणी देत असते. एखाद्या वर्षी पाऊस पडेलच याची खात्री नसते. पडला तरी तो वेळेवर, पुरेसा पडत नाही. नको तेव्हा हमखास पडतो आणि अनेकदा पिकांची नासाडी करतो. आता बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर  पाऊस आलाय म्हणून बरं वाटतंय. पण जमिनीचा खडा फुटला पाहिजे अन् विहिरीन्ला पाणी आलं पाहिजे.
 
आता तरी तेवढंच पाणी शेतकर्‍यांच्या पूर्ण मालकीचं राहिलं आहे. भविष्यात ते तसं राहील याची खात्री नाही कारण सरकारने आता असा एक कायदा केला आहे की, जमिनीच्या आतलं पाणी शेतकर्‍यांचं नाही. जमीन शेतकर्‍यांची असते आणि जमिनीवर येणारी पिकंही त्याची असतात पण भूगर्भावर शेतकर्‍यांचा हक्क नाही. तसा कायदा झाला आहे पण अजून तो अंमलात आलेला नाही. अमलात येईल तेव्हा विहिरीतलंही पाणी शेतकर्‍यांच्या मालकीचे राहणार नाही. आता ते त्याच्या मालकीचं आहे पण तेही अजून जमलेलं नाही. पूर्वा नक्षत्राचा पाऊस पडतोय पण तो अजून खडा फोडणारा नसल्यानं विहिरी भरत नाहीत. निसर्ग तर त्याला छळत आहेच पण सरकार नावाची यंत्रणाही त्याला सोडत नाही. आता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना काम पाहिजे . हाताला काम  आणि पोटाला अन्न पाहिजे. पण त्यासाठी सरकारच्या हातात पैसा पाहिजे आणि सरकारकडे पैसा नाही. वर दिल्लीत सरकार बसलंय पण त्याच्या हातातून पैसा सुटत नाही. दुष्काळ म्हणजे कशी ससेहोलपट असते ते सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांना ऐकून, वाचूनही माहीत नाही मग अनुभवून कुठलं माहीत असणार ?

Leave a Comment