सांस्कृतिक पुण्यात पार्टी संस्कृतीचे थैमान

पुणे: सांस्कृतिक राजधानीची बिरुदावली मोठ्या तोर्‍याने मिरविणार्‍या पुण्यात आता पार्टी संस्कृती अधिक फोफावत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या चिल्लर पार्टीच्या पाठोपाठ शनिवारी नगर रस्त्यावरील एका पबमध्ये आयटी प्रोफेशनल्सच्या हाय प्रोफ़ाईल पार्टीवर छापा घालून पुणे ग्रामीण पोलिसांनी ३०० जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा पब पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मालकीचा असल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे अहमदनगर रस्त्यावर वाघोली येथे माया या पबमध्ये रात्री ७ ते ११ या वेळेत पार्टीचे आयोजन करण्यास परवानगी असूनही शनिवारी रात्री बारानंतर आयटी प्रोफेशनल्सच्या बड्या पार्टीत नुकतेच कुठे रंग भरू लागल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार या पबमध्ये धाड घालून पोलिसांनी १५० पुरुष आणि १२५ महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ८६ हजार रुपये किंमतीचे उंची विदेशी मद्यही हस्तगत केले आहे.