हिंदी वृत्तवाहिन्यांना राज यांनी फटकारले

मुंबई: माझे बोलणे समजावून न घेता केवळ टीआरपी आणि जाहिरातीचा महसूल वाढविण्यासाठी हिंदी वृत्तवाहिन्या कोंबडे झुंजविण्याचे काम सुरू ठेवतील तर मी महाराष्ट्रातील त्यांचा खेळ थांबवीन; असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

बिहारमध्ये आरोपींना अटक करणार्‍या मुंबई पोलिसांवर बिहार राज्यशासन जर अपहरणाचे गुन्हे दाखल करणार असेल; तर महाराष्ट्रातील सगळ्या बिहारींना घुसखोर ठरवून हाकलून देऊ; असा इशारा मी दिला होता. मात्र हिंदी वृत्तवाहिन्यांना फक्त ‘तर’च्या पुढचे ऐकू आले. ‘जर’ कडे त्यांचे लक्षच नाही; अशी टीका करून राज म्हणाले की; या वृत्तवाहिन्यांनी नुसते कोंबडे झुंजविण्याचे, भांडणे लावण्याचे प्रकार करता कामा नयेत.

मी जे बोललो त्यावरून एवढे वादळ उठले. मात्र मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्राच्या सरकारला दम देणार्‍या बिहारच्या मुख्य सचिवाबद्दल कोणीच का काही बोलत नाही; असा सवालही राज यांनी केला.

हिंदी वृत्तवाहिन्यांना मी जे बोलतो ते कळत नसेल तर समजावून घ्या; नाहीतर मी काय करीन ते सगळ्यांना माहित आहे; असा टोला त्यांनी लगाविला. मराठी पत्रकारांना सारे कळते. हिंदीवाल्यांना काहीच काळात नाही आणि इंग्रजीवाले तर चंद्रावरच असतात. इथे देश पेटलेला असताना त्यांना ओबामांच्या निवडणुकीची काळजी पडली आहे; अशी उपरोधिक टीका राज यांनी केली.

Leave a Comment