कोळशाची कहाणी

भारताच्या संसदेत सुरू असलेली कोळशाची काळी कहाणी आता अधिकच काळी होत चालली आहे. या कहाणीत भारतीय जनता पार्टी खलनायकाची भूमिका वठवत असल्याचे दाखवले जात आहे. काही काँग्रेस धार्जिण्या पत्रकारांनी तसा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान मनमोहनसिग हे धीरोदात्त नायकासारखे आहेत आणि भाजपाने त्यांच्या तोंडाला खाणीतला कोळसा फासून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असे चित्र निर्माण करण्याचा या माध्यमांचा प्रयत्न आहे.

पण मनमोहन सिंग यांनी या संबंधातल्या चर्चेला उत्तर देताना आपण धीरोदात्त नायक नसून अंगात त्राण नसतानाही जबरदस्तीने घोड्यावर बसवलेल्या तिसमारखाँ आहोत असे सिद्ध करून दिले. आपले मौन अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे आहे असे ते म्हणाले. पण त्यांचा हा आव उसना होता. त्यांच्या मौनालाही काही किंमत नाही आणि त्यातून अनेक उत्तरांच्या  ऐवजी प्रश्नांनाच तोंड फुटले आहे. त्यांना भाजपाच्या सुषमा स्वराज यांनी बिनतोड उत्तर दिले. पंतप्रधानांचे मौन त्यांच्या सरकारच्या अनेक लफड्यांना वाचा फोडणारे आहे  म्हणून त्यांनी घाबरून मौन पाळले आहे असा टोला त्यांनी  पंतप्रधानांना लगावला.

काल सोनिया गांधीही या युद्धात उतरल्या. त्याही काही भाजपाला फार चोख उत्तर देतील असे वाटत नव्हतेच. झालेही तसेच. त्यांनी कोळशाच्या खाणीतल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर दिलेच नाही. उलट भाजपावरच आरोप केला. ब्लॅक मेलिंग करणे हा भाजपाचा पोटापाण्याचा धंदा आहे असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या अध्यक्षांकडून काही तरी अभ्यासपूर्ण उत्तर मिळेल असे वाटले होते पण त्यांनीही आरोपाला उत्तर देणे टाळून भाजपावरच प्रत्यारोप केला आणि आपल्याकडे भाजपाने केलेल्या आरोपाला कसलेही उत्तर नाही असे दाखवून दिले. मनमोहनसिंग यांची चुप्पी फार उत्तरे लपवणारी आहे असा दावा मनमोहनसिग यांनी स्वतः केला होता. ते खरोखरच तोंड उघडत नाहीत तो पर्यंत त्यांनी केलेला त्यांच्या मौनाच्या सामर्थ्याचा दावा किती खरा आणि किती खोटा हे काही समजणार नाही पण सोनिया गांधी यांनी तर मौन सोडले आहे ना ? मग त्यांच्या तोंड उघडण्यातून मनमोहनसिंग म्हणतात त्या उत्तरातली काही उत्तरे तरी मिळायला हवी होती. पण ती मिळाली नाहीत त्या अर्थी मनमोहनसिंग यांचेही मौन वंध्य असणार असे दिसत आहे.
 
सोनिया गांधी यांचा आरोप खरा की खोटा ? भाजपाचा खरेच कोणाला तरी ब्लॅकमेल करण्याचा धंदा असेल तर सोनिया गांधी यांनी त्यातली काही उदाहरणे द्यायला हवी होती. सोनिया गांधी यांना भाजपाने कधी ब्लॅक मेल केले आहे की नाही हे लोकांना कळलेले नाही कारण ब्लॅक मेलिंग ही गुपचुप होत असते. ती गुपचुप होत असते त्यामुळे लोकांना कळत नाही. पण सोनिया गांधी यांना त्यांच्याच संपुआघाडीतले घटक पक्ष मात्र वारंवार ब्लॅक मेल करीत असतात असे दिसत आहे. त्या आपल्या या मित्र पक्षांच्या ब्लॅक मेलिंगचे चोचले पुरवतात म्हणूनच त्यांना आपले सरकार टिकवून ठेवण्यात यश आले आहे. पण त्यांना भाजपाने ब्लॅक मेल करण्याचे काही कारणच नाही. नेहमी छुपा शत्रूच ब्लॅक मेल करीत असतो. भाजपा हा काही सोनिया गांधी यांचा छुपा शत्रू नाही. तो उघड शत्रू आहे. तेव्हा तो सोनिया गांधी यांनी सरळसरळ अडवेल. ब्लॅक मेलचे तंत्र कशाला वापरील ? कोळशाच्या खाणीत सरकारने भ्रष्टाचार केला म्हणून देशाचे १.८६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असा ऑडिट रिपोर्ट आहे. त्यामुळे या चुकीची, भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या  खात्याचे मंत्री म्हणून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात ब्लॅक मेल काय आहे ? हे तर विरोधकांचे कर्तव्यच आहे.

काही काँग्रेसधार्जिण्या पत्रकारांनी भाजपाला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना बोलू दिले नाही हे मोठेच पाप केले असे भासवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान बोलायला उभे राहतात तेव्हा सभागृहाने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे असते. तसा प्रघात आहे आणि भाजपाने तो मोडून लोकशाही पायदळी तुडवली आहे असे या लोकांचे म्हणणे आहे. पण आपण सांसदीय कामकाजाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की पंतप्रधान बोलायला उभे राहतात तेव्हा सर्वांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले पाहिजे असा काही नियमही नाही आणि प्रघातही नाही. अनेक पंतप्रधानांच्या निवेदनात गोंधळ झालेला आहे. अगदी पंडित नेहरूंच्याही भाषणात अनेकदा गोंधळ झालेले आहेत आणि काँग्रेसेतर पंतप्रधानांच्या भाषणात काँग्रेसच्या सदस्यांनीही गोंधळ घातलेला आहे. तेव्हा मनमोहनसिंग यांना बोलू दिले नाही हा काही फार मोठा औचित्यभंग झालेला नाही. उलट मनमोहनसिंग यांनी मात्र भ्रष्टाचाराचा ठपका बसला असूनही राजीनामा न देऊन त्यापेक्षा मोठा औचित्याचा भंग केला आहे. जो नियम त्यांनी ए. राजा याला लावला तोच त्यांनी स्वतःला लावला नाही. त्यांचे वर्तन अनैतिक आहे.