सरकारने रचला आपल्या बदनामीचा कट: रामदेव बाबा

हरिद्वार: आपल्याला ७० कोटी रुपयांच्या मिळकत करावर ३५ कोटी रुपयांचा मिळकत कर आकाराला असून केंद्र शासनाने आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचले आहे; असा आरोप योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे.

केंद्र सरकारला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ सुचली असून पतंजली योगपीठाला दान म्हणून मिळालेला पैसा सरकारला उत्पन्न वाटत आहे. समाजसेवा हा सरकारला व्यवसाय वाटत आहे; अशी टीका करून रामदेव बाबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लक्ष्य करीत; आता आपली लढाई प्याद्यांशी नव्हे तर वजीराशी आहे; असा इशाराही दिला.

कोळसाकांडाने तोंड काळे झाले असूनही थंड असलेले सरकार कसले ईमानी; असा सवालही त्यांनी केला. आपण सन १९९५ पासून सरकारला पै अन पैचा हिशोब देत असूनही आपल्या आंदोलनाने घाबरलेले सरकार यंत्रणांचा वापर करून आपल्यावर बालंट आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बाबांनी केला.