नवी दिल्ली: बाळकृष्ण यांच्या पाठोपाठ सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नजर आता खुद्द योगगुरू रामदेव बाबा यांच्याकडे वळली आहे. त्यांच्या दोन ट्रस्टच्या खात्यात असलेल्या रकमेबाबत ईडीने बाबांना नोटीस बजावली आहे. या दोन्ही ट्रस्टमार्फत परकीय चलन कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ईडीचा आक्षेप आहे.
रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठ ट्रस्ट आणि दिव्य योग मंदिर ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या खात्यातील ६० लाख रुपयांबाबत ईडीने ही नोटीस बजावली आहे. ईडीकडून थेट रामदेव बाबांना प्रथमच नोटीस बजावण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू असल्याने अधिक माहिती देण्यास ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंग यांनी नकार दिला.
या दोन्ही ट्रस्टची यापूर्वी आयकर विभाग आणि सेवाकर विभाग यांच्याकडून चौकशी झाली आहे.