बेदी, केजरीवाल यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर

नवी दिल्ली: बरखास्त टीम अण्णाचे दोन खंदे सदस्य अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यात भाजप अध्यक्षांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यावरून धुसफूस सुरू आहे. विशेष म्हणजे हे दोघेही आपसात चर्चा न करता ट्विटरवर जाहीरपणे आपल्या वादाची टिव टिव करीत आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने हातमिळवणी करून कोळसा खाण घोटाळा घडवून आणला; असा केजरीवालांचा आरोप आहे. रविवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वतीने पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

किरण बेदी यांना मात्र गडकरी यांच्या घराला घेराव का; असाच प्रश्न पडला आहे. सध्या केवळ सत्ताधार्‍यांना लक्ष्य करावे; असे त्यांना वाटते. विरोधी पक्षांनाही लक्ष्य केल्याने भ्रष्टाचार विरोधी आंदोलन कमजोर होईल; असे मत बेदी यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

दरम्यान; रविवारच्या घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून जवळ असलेली तीन मेट्रो स्थानके रविवारी सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

Leave a Comment