कोळसा खाणीत घोटाळाच नाही: चिदंबरम

नवी दिल्ली: युपीए-२ च्या कार्यकाळात कोणत्याही नव्या कोळसा खाणीला परवानगी दिलेली नाही. त्या आधी खाणी वाटप करताना आम्ही पूर्वीच्याच सरकारचे धोरण पुढे चालू ठेवले; असा दावा करीत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोळसा खाण घोटाळ्याचा चेंडू भारतीय जनता पक्षाकडेच टोलावला आहे.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी चिदंबरम आणि कोळसा मंत्री शीप्रकाश जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेतली.

कोळसा खाण वाटपात घोटाळा झाल्याचाच चिदंबरम यांनी इन्कार केला. या प्रकरणी चर्चेला पंतप्रधान मनमोहन सिंग तयार आहेत. मात्र विरोधकच संसद बंद पडून चर्चा होऊ देत नाहीत; अशी टीका त्यांनी केली.

युपीए-२ च्या काळात एकाही खाणीचे वाटप झालेले नाही. त्यापूर्वी आधीच्या सरकारची पद्धतच आम्ही पुढे सुरू ठेवली; असे स्पष्टीकरण चिदंबरम यांनी दिले.

यावर्षी कोळसा खाणीचे लिलाव शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन विरोधकांनी सहकार्य करावे; अशी अपेक्षा जयस्वाल यांनी व्यक्त केली.