अ‍ॅमेझॉन किंडल आता भारतातही उपलब्ध

नवी दिल्ली: अमेरिकेतील आघाडीची ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतात किंडल स्टोअर सुरू केले असून या माध्यमातून तब्बल १ कोटी पुस्तके ई- बुक स्वरूपात भारतीय वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. अ‍ॅमेझॉनचे ई-बुक रीडर ‘किंडल’ हे उत्पादनही उपलच्ध असून त्याचे भारतातील स्वागत मूल्य ६९९९ रुपये असणार आहे.

भारतात किंडलच्या किरकोळ विक्रीसाठी कंपनीने क्रोमबरोबर सहकार्य करार केला आहे. भारतीय वाचकांना ही सुविधा उपलब्ध करून देणे हे कंपनीसाठी अभिमानास्पद असल्याची भावना अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे उपाध्यक्ष रुस ग्रँडीनेट्टी यांनी व्यक्त केली.

अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून नव्या पिढीतील वाचकांना आवडणार्‍या चेतन भगत, अश्विन सांघी, रवींद्र सिंग आणि अमीष त्रिपाठी अशा लेखकांबरोबरच अनेक देशी, विदेशी पुस्तके उपलब्ध होणार आहेत. नव्या पिढीला वाचनाकडे आकृष्ट करणारे किंडल हे उत्पादनही भारतात केवळ क्रोमच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे; असे क्रोमचे कार्यकारी संचालक अजित जोशी यांनी सांगितले.

अ‍ॅमेझॉनने भारतातील लेखक आणि प्रकाशकांसाठी मुक्त प्रकाशनाची (किंडल डायरेक्ट पब्लिशिंग) सुविधा उपलब्ध करून दिली असून या सुविधेमार्फत भारतीय लेखक आणि प्रकाशकांना आपले साहित्य किंडल ई- बुक रीडर आणि वेबसाईट या दोन्ही माध्यमातून मोफत प्रकाशित करता येणार आहे.